पांढरी शुभ्र सफारी, रूबाबदार चाल, सहा फूट उंची, नजरेत करारीपणा, धारदार नजर… असे व्यक्तिमत्व होते बाबा धुमाळ यांचे. शिवसेना म्हटले की बाबा आणि बाबा म्हटले की शिवसेना..! अशी छाप सोडलेल्या बाबांना जाऊन आज एक वर्षे पूर्ण झालं.
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात शिवसेनेचा प्रतिकूल काळ असतानाही ज्या काही व्यक्तिमत्वांमुळे शिवसेना ओळखली जायची, शिवसेनेबद्दल धाक वाटायचा अशा व्यक्तिमत्वांमध्ये बाबा धुमाळ सर्वोच्च स्थानी होते. शिवसेनेचे शाखाप्रमुख, शहरप्रमुख ते जिल्हाप्रमुख आदी महत्त्वपूर्ण पदांवर बाबांनी आपल्या कामाचा व शैलीचा ठसा तर उमटविला होताच परंतू बाबांना देशव्यापी नाव व लोकप्रियता वाहतूक संघटनेच्या पदामुळे मिळाली हे निर्विवाद सत्य आहे. १९८० च्या दशकात बाबा धुमाळ यांनी या शहरावर खऱ्या अर्थाने राज्य केले. शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असताना कुठलेही आंदोलन असो, मोर्चा असो… बाबा रस्त्यावर उतरले की शिसैनिकांना जोश येई, त्या मोर्च्याची धार चढे. बाबांच्या धाडसी, डेअरींगबाजीचे किस्से मातोश्रीपर्यंत पोहोचत असे. शिवसेनाप्रमुख बाबाळासाहेब ठाकरे यांची थेट भेट घेणाऱ्या मोजक्या व्यक्तिंमध्ये बाबा धुमाळ मोडत असत.
१९९८ मध्ये ऑल इंडिया मोटर्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष असताना आपल्या मागण्यांसाठी देशभरातील मालवाहतूकदारांचा संप बाबांनी घोषित केला होता. संपाच्या तिसऱ्या दिवशी दूध, भाजीपाला, धान्य, सिलेंडर वाहतूक आदींचा प्रचंड खोळंबा झाल्याने हवालदिल झालेल्या तत्कालीन वाजपेयी सरकारने संप मागे घ्यावा यासाठी थेट बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली. ‘बाबा विनाकरण संप पुकारणार नाही, मागण्यांबाबत तात्काळ सकारात्मक कार्यवाही करा, मगच मी बाबाला संप मागे घेण्याबाबत आदेश देईल’ असे बाळासाहेबांनी थेट वाजपेयी सरकारला सुनावण्यास कमी केले नव्हते. अखेर प्रमोद महाजनांनी बाबांशी मध्यस्थी करून हा प्रश्न सोडविला होता. आज बाबांचा पहिल्या स्मृतीदिनानिमित्त बाबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहून बाबांच्या सामाजिक कार्याचा वसा चालू ठेवणार असल्याचे नमूद केले. निगडी येथे आज सकाळी अकरा वाजता पुलवामा येथे शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रूपये असे एकूण १ लाख रूपये बाबांचे चिरंजीव अमित धुमाळ यांनी आज प्रदान केले. माथाडी मजदूर संघाचे नेते इरफानभाई सय्यद, शिवसेनेच्या संघटिका सुलभा उबाळे, गुलाब गरूड आदी यावेळी उपस्थित होते.