(विजय जगताप)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी आपले काका शरद पवार यांना साथ दिल्याने गेल्या दोन दिवसात त्याचे पडसाद समाज माध्यमांवर आणि विशेषतः बारामती मतदारसंघात फार वेगाने पडले आहेत.
कळसच पायाला आव्हान देत असल्याच्या या घटनेतून अजित दादांचा निर्णय पवार कुटुंबियात कोणालाच पसंत पडलेला नाही यावर या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. मागील महिन्यातील १७ फेब्रुवारी रोजी बारामतीतील एका जाहीर भाषणात स्वतः अजित पवारांनी, ” बारामतीत मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होईल, माझा परिवार सोडून सगळे कुटुंबीय विरुद्ध जातील” अशी भावना व्यक्त केली होती. ती खरी होत असल्याचे प्रत्यंतर मागील आठवड्यात युगेंद्र पवार आणि परवा श्रीनिवास पवार यांच्या जाहीर प्रतिक्रियांनी दिसून आले आहे. का सोडत आहेत सगळे अजित पवारांची साथ? यामागे मानवी वर्तन व नातेसंबंधात असलेले मानसशास्त्रीय विश्लेषण,तसेच संस्कृती, संस्कार, वडिलधाऱ्यांचा मान व ज्येष्ठांचा सन्मान या संकेतात दडलेले आहे. बारामती मध्ये आजही गोविंदराव पवार व शारदाबाई पवार या जोडीकडे वटवृक्ष म्हणून पाहिले जाते.१९५० च्या दशकात त्यांनी केलेले कार्य हा इतिहास आहे. तत्कालीन लोकल बोर्डाच्या सदस्य असलेल्या शारदाबाईंनी ज्या हिंमतीने व लढाऊ वृत्तीने राजकीय व सामाजिक नेतृत्वाची पायाभरणी केली, तोच वसा आणि वारसा गेली साठ वर्ष शरद पवार चालवत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श, एकसंध, अतिशय घट्ट बाॅंडिंग असलेला परिवार म्हणून पवार घराण्याकडे पाहिले जाते. दिवाळी सणात आख्ख्या कुटूंबाची एकत्र येणे, भाऊबीज साजरी करणे ही पृथ्वीतलावरील एकत्रित कुटुंबाची अनोखी मिसाल असल्याचे चित्र पाहायला मिळायचे. आणि त्याच परिवारातील अजित पवारांनी २ जुलै २०२३ रोजी आपल्या काकांशी फारकत तर घेतलीच शिवाय अआख्खा पक्षच ताब्यात घेतला. काकांपासून वेगळं होणं, दुसऱ्या पक्षात जाणं ही कृती एक वेळ पवार कुटूंबियांनी स्वीकारली देखील असती, हे वेगळं होणं मान्यही केलं असतं, परंतू पक्ष ताब्यात घेऊन ८३ वय असलेल्या आपल्या “हेड ऑफ फॅमिली” स्थान असलेल्या व्यक्तीस लढण्यासाठी आव्हान देणं, हेच मुळी कुटुंबात कोणाला पसंत पडलेले नाही.
आता याद्वारे अजितदादा काय सिद्ध करणार ? काय मिळवणार? आणि कोणाच्या साथीने मिळवणार? या सवालांच्या आणि अस्वस्थतेच्या ठिणग्या कुटुंबात उडू लागल्या. आणि आता त्याचे पडसाद सर्वत्र बाहेर उमटू लागले. गाय-वासरू,चरखा असो की हाताचा पंजा,की घड्याळ.. या साऱ्या चिन्हांचा प्रचार करताना शरद पवारांच्या साऱ्या बहिणी, मेव्हणे ,भाचे, पुतणे, जावई एकत्र येत असल्याचं अआख्ख्या बारामती विधानसभा व लोकसभा मतदारसंघातील जनता १९६७ पासून पहात आली आहे. आणि आता यंदा प्रथमच “शरद पवारांना मत देऊ नका” असे अप्रत्यक्षरित्या अजित दादांना सांगावे लागत असल्याची वेदना कुटुंबाला गदगदून टाकणारी व भावनांचा कोंडमारा करणारी ठरली आणि त्याचेच प्रतिबिंब आता अजित दादांच्या विरोधात घरातलेच जावू लागल्याने उमटू लागली आहे.