( विजय जगताप)
नितीश कुमार यांनी त्यांच्या वडिलांचा अपमान केला तरी योग्य वेळी बदला घेऊ या प्रतिक्षेत ते शांत राहिले, मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडात त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीमध्ये त्यांच्या पक्षाला शंभर टक्के यश मिळाले आणि त्यांचा पक्ष देशातील एकमेव असा पक्ष ठरला की आपल्या वाट्याला आलेल्या पाच पैकी पाच जागांवर त्यांचे खासदार निवडून आले.
बॉलीवूड मध्ये हिरो म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात केलेले चिराग पासवान आज बिहार मधील लोक जनशक्ती प्रमुख आहेत. देशात प्रथम क्रमांकाच्या सक्सेस रेटमध्ये त्यांच्या पक्षाचे नाव आज घेतले जाते. एक दलित युवा नेता असलेल्या चिराग यांना केंद्रीय मंत्रिमंडळात तर आता घ्यावेत लागणार आहेत शिवाय त्यांच्यावर झालेल्या दुर्लक्षाची भाजपला आता न सांगता भरपाई करून द्यावी लागणार आहे. आज “बातमी खास” मध्ये आपण चिराग पासवान यांच्या बद्दलची विशेष माहिती जाणून घेणार आहोत.
“हवामान शास्त्रज्ञ” अशी ओळख असलेले देशातील एकमेव नेते म्हणून रामविलास पासवान यांना ओळखले जाते, कारण व्ही. पी. सिंग, नरसिंहराव, देवेगौडा, गुजराल, वाजपेयी, मनमोहन सिंग, आणि मोदी अशा सात जणांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिल्याची इतिहासात नोंद आहे. लोक जनशक्ती पक्ष या आपल्या प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून बिहार राज्यात रामविलास पासवान यांची दलित नेता म्हणून देशात ओळख होती. २०१९ मध्ये लोक जनशक्ती पक्षाने बिहार मधून लोकसभेच्या सहा जागा लढवून सहापैकी सहाही जागांवर खासदार निवडून आणले. साहजिकच मंत्री म्हणून चिराग यांचे वडील रामविलास पासवान यांचा तेव्हा मोदी सरकारमध्ये समावेश झाला. मात्र २०२० मध्ये अचानक रामविलास पासवान यांचे निधन झाले. आपला मुलगा चिराग याच्याकडे त्यांनी मृत्यूपूर्वी पक्षाची धुरा सोपवली होती. चिराग यांना वडिलांच्या राजकीय प्रवासाची बालपणापासूनच माहिती होती, परंतु राजकारण हे आपले क्षेत्र नाही असे त्यांनी ठरवून टाकले होते. सहा फूट उंची, पिळदार शरीरयष्टी, गोरा रंग आणि देखणा चेहरा असलेल्या चिराग यांनी २०१० ला मुंबई गाठली होती आणि “हम मिले ना मिले” या बॉलीवूड पटातून दमदार एन्ट्री देखील केली होती. विशेष म्हणजे या पिक्चरची हिरॉईन होती कंगना राणावत. दुर्दैवाने हा पिक्चर आपटला. आणि चिराग यांनी हिरो बनण्याचा नाद सोडून पुन्हा बिहार गाठले. वडिलांच्या निधनानंतर सहा खासदारांना एकत्रित ठेवण्याच्या प्रयत्नात असतानाच चिराग यांचे सख्खे काका (चुलते) पशुपतीनाथ यांनी पाच खासदार फोडले आणि पक्षावर ताबा मिळवला. हा संघर्ष न्यायालयात पोहोचला. पंतप्रधान मोदींनी चिराग ऐवजी पशुपतीनाथ यांना आपल्या छायेत घेतले. चिराग तरीही शांत राहिले, त्यांनी मोदींशी संघर्ष टाळला. पुढे न्यायालयात चिराग यांचा विजय झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि चिराग यांच्या लोक जनशक्ती पक्षामध्ये जे जागावाटप झाले त्यामध्ये चिराग यांना अवघ्या पाच जागा देण्यात आल्या. चिराग यांनी पाच पैकी पाच जागांवर दणदणीत यश मिळवले. परवा टीव्हीवर निकाल झळकत होते. आणि भाजप स्वबळावर सत्तेपासून दूर राहिल्याचे स्पष्ट होत होते….आणि मधूनच एक बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकू लागली. लोक जनशक्ती पक्षाने पाच पैकी पाच जागांवर विजय मिळवला होता… चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अमित शहा यांनी लगेचच खिशातला मोबाईल काढून चिराग यांचं अभिनंदन केले. संपूर्ण देशाने हे दृश्य पाहिले.. एकेकाळी अवहेलना वाट्याला आलेल्या चिराग यांचा सन्मान म्हणूनच कौतुकास प्राप्त ठरतो.