( विजय जगताप)
अडीच लाखाचे मताधिक्य घेऊन आपण जिंकणार असल्याचा ठाम दावा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला खरा, मात्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) काही कार्यकर्त्यांनी काम केले नसल्याचे त्यांनी थेटपणे स्पष्ट केले परंतु भाजपच्या काही धुरिणांनी देखील त्यांचे काम केले नाही हे माहित असूनही त्यावर मात्र त्यांनी सोयीस्कर पडदा टाकला आहे.
खासदार बारणे यांचा मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क, खासदारकीचा तब्बल दहा वर्षाचा अनुभव, दोन टर्म मध्ये जोडलेली हजारो माणसे आणि महाशक्ती अर्थात भाजपची मागे असलेली ताकद यामुळे बारणे यांच्या विजयाची शक्यता अधिक होती. परंतु खास पत्रकार परिषद घेऊन विजयाचा दावा करणे म्हणजे “वाराणसी मधून मीच निवडून येणार ” हे नरेंद्र मोदी यांनी व रजनीकांत आणि अमिताभने “माझा आगामी चित्रपट चालणार” असे सांगण्यासारखा प्रकार झाला. सुज्ञ, अभ्यासू, जाणकार यांना काय निकाल लागेल, हे माहिती होते परंतु असे ढोल बडवून व राष्ट्रवादीवर नाराजी दाखवून बारणे यांनी काय साध्य केले कळायला मार्ग नाही.
मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती होऊन सलग तीन वेळा शिवसेनेलाच निवडून द्यावे लागत आहे ही अस्वस्थता तिसऱ्या खेपेला भाजपमध्ये अखेर ओठावर आली व आक्रमकपणे जाहीरही झाली. पुण्यातील या हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तर थेट बारणे यांना, ‘भाजप कार्यकर्त्यांना यापुढे अंतर देऊ नका” असे स्पष्टपणे सांगावे लागले व बारणेंना देखील मान डोलवावी लागली होती हे वास्तव होते, पर्यायाने पुढे पिंपरी चिंचवड शहर, मावळ विधानसभा व घाटा खालील तीन मतदार संघात भाजपकडेच बारणे यांच्या प्रचार यंत्रणेची व नियोजनाची सारी सूत्रे होती. शिवसेना (शिंदे गट) पिंपरी चिंचवड शहरप्रमुख, व अन्य पाच तालुकाध्यक्ष यांची नावे आठवावी लागतात हे शिवसेनेचे (शिंदे गट) अपयश या निवडणूकीत प्रकर्षाने दिसून आले. भाजपच्या बॉटम स्तरावरील कार्यकर्त्यांचा देखील सक्रिय सहभाग बारणेंसाठी काम करत होता परंतू काही प्रमुख झारीतील शुक्राचार्यांनी मात्र शो बाजी करण्याशिवाय काहीच केले नाही. हे बारणे यांना देखील माहिती आहे परंतु त्यांची तक्रार कदापि केली जाणार नाही. कारण मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी धनुष्यबाणावर शिक्का मारा, असाच सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारणे यांचा प्रचार राहिला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्वाभिमान, अस्मिता यासाठी किंवा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी धनुष्यबाणावर मत द्या” असे बारणे यांच्या प्रचारात काही घडले नाही. संपूर्ण प्रचारात बारणे यांनी पंतप्रधान मोदींच्याच प्रतिमेचा वापर केला, थोडक्यात पंतप्रधान मोदी यांच्या नावात असलेल्या करिश्माचा तिसऱ्यांदा उपयोग बारणे यांना त्यांनी आज केलेल्या विजयाच्या दाव्यानुसार झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.
पिंपरी चिंचवड, ,मावळ, पनवेल आदी भागात भाजपच्या काही मान्यवरांनी कार्यकर्त्यांवरच कुणाला मते द्यायची याचा निर्णय सोपविला होता हे वास्तव असले तरीही हे काम फार छुप्या रूपात झालं. काही भाजपच्या मंडळींची अवस्था तर “सांगताही येईना आणि सहनही होईना” असे बारणे यांच्या बाबतीत झाले होते. वास्तविक राष्ट्रवादी अजित पवार गट उशिरा भाजप सेनेच्या कळपात आला, शिवाय भाजपची सेनेशी असलेली युती ही भावनिक तर अजित पवार गटाशी असलेली युती ही राजकीय असल्याने राष्ट्रवादी व बारणे यांच्यातील मैत्री धर्म शेवटपर्यंत एकमेकांप्रती विरघळलाच नाही. तसेच राष्ट्रवादी व शिवसेनेत प्रेम व आपलेपण शेवटपर्यंत निर्माणच झाले नाही ही खरी मेख आहे. परंतु बारणे यांनी आज केलेल्या अडीच लाख मताधिक्याच्या दाव्याची माहिती पत्रकारांना सांगताना, पाच लाखाहून अधिक मते मशालला अर्थात संजोग वाघेरे यांना पडतील असे गृहीत धरले आहे. पाच लाख मतांचा हा आकडाही थोडा नाही. जे बारणे प्रचार काळात ” आपला प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हे माहित नाही? असे अहंकारयुक्त शब्दात म्हटले होते ते वाघेरे आता ( बारणे यांच्या हिशेबानुसार)पाच लाख मते घेणार आहेत. थोडक्यात उमेदवारी अर्ज भरायच्या ९० दिवस अगोदर शिवसेनेत (उबाठा) आलेल्या वाघेरे यांनी मातब्बर व अनुभवी बारणेंना दिलेली ही जबरी टक्कर तर आहेच शिवाय बारणे यांच्या दैदीप्यमान अपेक्षित यशाला वाघेरे यांनी लावलेला हा सुरुंग ठरणार आहे. जर वाघेरे यांना पाच लाखाहून अधिक मते मिळणार असतील तर “ऊबाठाची मावळमध्ये ताकद नाही” हा बारणे यांनी आज केलेला दावा तकलादू म्हणावा लागेल. त्यामुळे २९ वर्षांपूर्वी कधीकाळी महापौर असलेल्या वाघेरे यांनी त्यानंतर कुठल्याही संसदीय पदावर नसताना देखील घेतलेली ही झेप म्हणजे एखाद्या नवोदिताने “एकदा भाजपची साथ सोडून रिंगणात या” असे आव्हान देणारी आहे असाच त्याचा अर्थ निघणारी आहे.