(विजय जगताप )
(विजय जगताप )
शिरूर मधील ताकदीचा माजी खासदार राष्ट्रवादीने (अजित पवार गट) आपल्या पदरात घेतल्याने शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यात पुणे जिल्ह्यातील एकमेव जागा श्रीरंग बारणे यांच्या रूपाने आहे. अशातच मित्रपक्षानींच बारणेंच्या पायाखाली साप सोडल्याने त्यांना शह देण्यासाठी व कोंडी फोडण्यासाठी शिवतारे यांना बारामती मधून पवाराविरोधातील धार कायम ठेवण्याची चाल खेळण्यात आली आहे.
‘खासदार श्रीरंग बारणे यांचा मार्ग खुला करू,परंतु त्यांनी कमळावर लढावे ‘असाही पर्याय भाजपकडून रेटण्यात येत आहे. बारणे तिसऱ्यांदा खासदार झाले तर गुणवत्ता व कामगिरीच्या बळावर त्यांना किमान केंद्रात राज्यमंत्री पद लाभू शकते ,अशी स्थिती आहे. मात्र भाजपकडून बारणे लढणे म्हणजे “शिवसेनेकडे शरीर व हृदय भाजपकडे” जाऊन उपयोगाचं नाही,असे मुख्यमंत्र्यांचे गणित आहे. बारणे हे शिवसेनेचे मंत्री असणे शिवसेनेच्या ( शिंदे गट)अस्तित्वासाठी ऑक्सिजनचे काम करणार आहे. आपल्याच दोन्ही मित्रपक्षांनी चारी बाजूंनी बारणेंची कोंडी केलेली पाहता शिवसेनेची अवस्था “सांगता येईना आणि सहनही होईना” अशी झाली आहे. यावर उतारा म्हणून बारामती मधून विजय बापू शिवतारेंना अजित पवारांविरोधातील धार चांगली चालवा,असे सांगितले गेल्याचं गणित आहे. बारणे निवडून आले तर पुणे जिल्ह्याचे शीर्षस्थ नेते बनतील,ही देखील मित्र पक्षांना पोटदुखी आहे. शिवसेनेच्या विभाजनामुळे शिंदे गटाची ताकद मावळ लोकसभा मतदारसंघात तुटपुंजी आहे,हे वास्तव आहे. २०१४ व २०१९ मधील बारणेंच्या विजयात भाजपचा सिंहाचा वाटा आहे, हे बारणेंनीदेखील वेळोवेळी जाहीर कबूल केले आहे. यंदाही भाजप ठरवेल ते धोरण, बारणे यांच्या विजयाचे तोरण असणार आहे ही काळया दगडावरची रेष आहे.