( विजय जगताप)
असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथं स्व. किरणशेठ मांजरे यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा ठसा उमटविला नाही ?… . व्यापार आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांची गुणवत्ता व कौशल्य पाहून साक्षात् रिझर्व्ह बँकेच्या तज्ज्ञांनी देखील त्यांची पाठ थोपटली होती…
चाकणकरांचा श्वास व मांजरे घराण्याचा अभिमान व ध्यास असलेलं हे नाव आता दस्तावेज बनून, नव्या पिढीतील तरुणाईला व मराठी मुलां – मुलींमध्ये अजरामर राहणार आहे.
वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मागील आठवड्यात किरणशेठ मांजरे यांचं निधन झालं. व्यापार, उद्योग, सहकार, बँकिंग, तसेच शिक्षण, कला, क्रीडा आणि संगीत आदी क्षेत्रांत चौफेर मुशाफिरी केलेल्या स्व. किरणशेठ मांजरे यांच्या जाण्याने, संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
आपले वडील दिवंगत माजी आमदार वसंतराव मांजरे यांच्या सचोटी, चिकाटी व प्रामाणिकपणा या गुणांच्या संस्कारावर किरणशेठ यांची वाटचाल सर्वांना अभिमान वाटणारी ठरली. सहकार आणि शिक्षण या माणूस घडवण्याचा पाया असलेल्या क्षेत्रांमधून किरणशेठ यांनी वाटचाल सुरू करत, बँकिंग क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रातही तितकी दमदार वाटचाल केली. एखादा माणूस आपल्या जीवनात किती क्षेत्रांत अफाट कामगिरी करू शकतो हे पाहण्याचं व अभ्यासण्याचं केंद्र तर ते ठरलेच. शिवाय, वयाच्या पन्नाशीनंतर आपल्या नावाचं लोककल्याणकारी विद्यापीठ ते बनले… . किरणशेठ मांजरे यांच्या कार्याला केवळ खेड तालुकाच नव्हे तर पुणे जिल्ह्यातही दिर्घकाळ कोणी विसरू शकत नाही. त्यांच्या अष्टपैलू गुणांमध्ये पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांचे कार्य, लोकसंपर्क आणि माणसांची साखळी जोडलेला हा ” माणसातला देवमाणूस ” स्वर्गलोकी देखील आता आपल्या कार्यरूपाचा झेंडा फडकावत राहतील.
कोणीच विसरणार नाही आणि विसरू शकत नाही असं त्यांनी रचून ठेवलेलं कार्य; त्यांच्या आवडत्या ” मैं ना भुलूंगा… . ” या गीताप्रमाणेच सदैव स्मृतींच्या कप्प्यात बंदिस्त राहील. आपले कार्यरूपी संचित मागे ठेवून गेलेल्या या पुणे जिल्हा व खेड तालुक्यातील मैत्रभावश्रीमंत अन् अजातशत्रू अशा सर्वप्रिय अन् बहुआयामी व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली आणि अखेरचा राम कृष्ण हरी !… .