चिंचवडगावातील गुपचूप वाडा आणि मदन जोशी… म्हणजे एक वास्तू आणि एक व्यक्ती..असं समीकरण ..!
चिंचवडगाव परिसर कोळून पिलेल्यांना मोरया गोसावी मंदिरा शेजारील गुपचूप वाडा माहित नाही,असं शक्यच नाही. १९१० पासून मदनरावांचे आजोबा, वडील व नंतर मदन यांचे वास्तव्य या वाड्यात गेले. मदनराव यांचे वडील वसंतराव म्हणजे प्रख्यात नाटककार, गीतकार व संगीतकार…! संगीत नाटक, नाट्यपदे, शास्त्रीय गायन यामधील अतुलनीय कामगिरीबद्दल मदनरावांच्या वडिलांना साक्षात बालगंधर्वांनी शाबासकी दिल्याचा इतिहास आहे. दुर्दैवाने हा वारसा सांगण्या पलीकडे मदनरावांमध्ये वडिलांचे हुबेहुब गुण काही उतरले नाहीत. कर्तबगार राजाच्या पोटी साधा, भोळा राजपुत्र जन्माला यावा.. कदाचित तसं झालं असेल.
माझा आणि मदनरावांचा परिचय १९९४ पासूनचा म्हणजे तब्बल ३० वर्षांचा…! मदन जोशी तेव्हा फोटोग्राफी करायचे.लग्न, साखरपुडा, काही शाळांची फोटोग्राफी ,अशा ऑर्डर ते घ्यायचे, त्याचबरोबर तेव्हाच्या साप्ताहिकांना, दैनिकांना फोटो पुरवायचं देखील ते काम करायचे. हळूहळू खाजगी फोटो काढणे बंद होऊन मदनराव पूर्ण वेळ प्रेस फोटोग्राफर बनले. पत्रकारिता कळपात आल्यानंतर पत्रकारही बनले. मोठ्या दैनिकांचे पत्रकार चिंचवड मधल्या घटना घडामोडींसाठी जोशींकडून माहिती घेत असत. त्यामुळे मदनराव सर्वांचाच हक्काचा माणूस होते. प्रसिद्ध पत्रकार ग.रा. यादव यांच्या तालमीत हरकाम्या म्हणून मदन जोशी यांचा सुरु झालेला प्रवास आता पत्रकार म्हणण्या पर्यंत स्थिर झाला होता. घरची साधारण परिस्थिती असल्याने मदनराव सायकलवर घरोघर दूध पिशव्या घालणे,नंतर पेपरच्या लाईनी टाकणे आणि दिवसभर कॅमेरा गळ्यात लटकावून पत्रकारांबरोबर फिरणे हा त्यांचा दिनक्रम होता. एक जुना किस्सा फार मजेशीर आहे.आझमभाई पानसरे मदनरावांचे वर्गमित्र…! एकदा १९८० च्या दरम्यान आपले वडील फकीरभाईंना सांगून आझमभाईंनी चिंचवडच्या जयश्री थिएटरमध्ये पिक्चर चालू- बंद करायची मदनरावांना नोकरी लावली. परंतू हुशारी, तल्लखपणा व तांत्रिक ज्ञान फारसे नसल्याने सहा महिन्यातच मदनरावांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं. त्याचं असं घडलं की, “कहानी किस्मत की” या धर्मेंद्रच्या पिक्चरचे एकूण चार रिळ होते. इंटरव्ह्यलनंतर मदनरावांनी तिसरा रिळ न लावता थेट चौथा रिळ टाकल्याने वीस मिनिटातच पडद्यावर “समाप्त” ची पाटी आली आणि मदनरावांना थिएटरमधून समाप्ती घ्यावी लागली. सगळीकडेच अपयश, निराशा येत होती तरी मदनराव दरवर्षी न चुकता आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त एकपात्री अभिनय स्पर्धा, एकांकिका स्पर्धा भरवत. नाट्यगृहाला माझ्या वडिलांचे नाव देणे किती समर्पक आहे, हे दिसेल त्याला ते पटवून सांगत. परंतु मदनरावांना कोणीच कधी गंभीरपणे घेतले नाही. महात्मा फुले यांच्यावर चित्रपट काढायचा गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या मनात घोळत होतं.मदनरावांचं स्वतःला पत्रकार म्हणून सांगणं, पत्रकारांच्या थव्यात फिरणं… अनेकांना खटकायचं. रामशास्त्री प्रभुणे बाणा असणारे पत्रकार त्यांना “पत्रकारिता धर्म” सांगत,कधीकधी हि बाणेदार मंडळी माझ्याकडं तक्रारी करत. “मग तुमच्या नजरेत पत्रकारिता धर्म आचरण करणारे कोण?” असा माझा त्यांना सवाल असे. मदनरावांना या मंडळींशी नडण्याचे सामर्थ्य नसल्याने हतबल होण्याशिवाय पर्याय नसे. २००० मध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री असताना एकदा पालिकेत आले होते. तेव्हा थेट दादांवर भडकत “तुमचे अधिकारी आमच्यासारख्या साप्ताहिकांच्या पत्रकारांना प्रेस नोट देत नाही, कळवत नाही” अशी तक्रार दादांपुढे केली. मदनरावांमधील साधेपणा, भोळेपणा अजित दादांनाही आवडला. दादांनी तत्कालीन जनसंपर्क अधिकारी पद्माकर खोपे यांना लगेच ताकीद दिली. मदनरावांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साप्ताहिकवाल्यांनी आपली खंत ,मळमळ वेदना काढल्याचे नंतर स्पष्ट झालं. परंतु याचा सकारात्मक परिणाम म्हणजे यापुढे, “मदनरावांना पहिलं कळवायचं, मग इतरांना…असा अलिखित फतवा पालिकेने काढला.
१४ मार्च हा मदनरावांचा वाढदिवस असे. १५ मार्चला ते भेटले की माझ्यासारख्या जवळच्या अनेकांवर डाफरत. “काल काय होतं.. माहित नव्हतं का…? मी डोकं खाजवायचो. “आठव… आठव… “असे ते म्हणत.शेवटी मी हरायचो. मग हळूच मंद हास्य करीत ते कानात बोलायचे…”अरे काल माझा वाढदिवस होता तू शुभेच्छा देशील असं वाटलं..” मी खजील होत ‘सॉरी’ म्हटल्यावर मग नंतर खुश व्हायचे. मदनरावांचा राग क्षणात निघून जाई. २०१७ मध्ये एकदा ते म्हणाले,” त्या अमक्या तमक्याला सांग, मदनचा वाढदिवस आहे, १४ तारखेला शुभेच्छा दे म्हणावं..” मी म्हणायचो ,”ते आता मोठे नेते आहेत, आपण बळंच कसं सांगायचं…” त्यावर मदनराव म्हणत ,”त्याला काय होतंय..तो असेल मोठा त्याच्या घरी… ” लोकांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात,बुके द्यावे ,असे त्यांना मनापासून वाटायचं. त्यांच्यात एक लहान मूल दडलेलं आढळून यायचं. २०१९ मध्ये मी अनाथ निराधारांसाठी मावळात वृध्दाश्रम बांधायला सुरुवात केली.जागा घेण्यापासून वृध्दाश्रम सुरू होईपर्यंत मदनराव शंभर वेळा तरी माझ्याबरोबर येथे आले असतील.मागील दोन वर्षापासून ते अधून मधून येथे येत दोन चार दिवस राहत, आणि कंटाळा आला की निघून जात असत. डिसेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात ते मात्र बरेच दिवस राहिले, मला याचं आश्चर्य वाटलं होतं. वृद्ध कलावंत म्हणून त्यांना सरकारी पेन्शनही (दिड हजार )चालू झाली होती. शहरातील पत्रकार संघटनांच्या शीत युद्धात एका पत्रकार संघाने विशेष कार्य दाखविण्याच्या निमित्ताने त्यांना मोठ्या सन्मानाने ज्येष्ठ पत्रकार म्हणून पाच हजार पेन्शन सहा महिन्यांपूर्वी चालू केली असे माझ्या कानावर आले होते.मागील तीन महिन्यांपासून म्हणजे १५ डिसेंबर नंतर आमची भेट झाली नव्हती .मागच्या आठवड्यात म्हणजे १३ मार्चला व्हाट्सअप वर त्यांचा मला मेसेज आला. त्यात म्हटलं होतं की, “श्री मदन वसंत जोशी यांचा १४ मार्चला वाढदिवस आहे”.मी मेसेज वाचला आणि नकळत चेहऱ्यावर हसू उमटले.मदनरावांमधील हौशी बाल्य मला पुन्हा दिसलं. १४ मार्चला मी आवर्जून त्यांना फोन केला, परंतु फोन उचलला नाही. आणि आठच दिवसात म्हणजे काल त्यांचे निधन झाल्याचं समजलं. सुन्न झालो…तीस वर्षांचा सगळा पट डोळ्यासमोर तरळला
- विजय जगताप