( विजय जगताप)
दोन शिवसेनेमध्ये सामना असणाऱ्या महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून गेली सलग तीन टर्म शिवसेनेलाच पसंती देणारा हा मतदारसंघ यंदा कोणत्या शिवसेनेला संसदेत पाठवणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख असलेले शिवसेनेच्या वतीने श्रीरंग बारणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे संजोग वाघेरे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही उमेदवारांमधील साम्य म्हणजे दोघेही घाटावरील भागातील म्हणजेच पिंपरी चिंचवड शहरातील आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनच दोघांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनाला प्रारंभ झाला आहे. वाघेरे यांनी महापौर पद तर बारणे यांनी स्थायी समिती अध्यक्ष अशी सर्वोच्च पदे भूषवलेली आहेत. बारणे हे नगरसेवक पदावरून २०१४ मध्ये थेट संसदेत पोहोचले शिवाय खासदारकीचा दहा वर्षाचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू तर संसदेच्या दाराची कडी वाजविण्याच्या रांगेत प्रथमच वाघेरे उतरले आहेत. शिवसेनेचे पहिल्यांदाच तिकीट मिळवण्यासाठी दोघांनाही फारसा संघर्ष व घाम गाळावा लागलेला नाही. २०१४ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे विद्यमान खासदार गजानन बाबर यांना दुसऱ्यांदा तिकीट न देता बारणे यांची मावळचा शिलेदार म्हणून निवड केली. विद्यमान खासदाराचे तिकिट कापून फार मोठे धाडस व विश्वास उद्धव ठाकरे यांनी बारणेंसाठी व्यक्त केला होता. तत्कालीन मोदी लाटेत बारणे यांनी मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं. नंतर २०१९ ला देखील मोदी लाटेचा झंझावात पुन्हा बारणे यांना लाभदायी ठरला. अलिकडे दीड वर्षांपूर्वी बारणे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे सेनेत केलेला प्रवेश हा ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. बारणे यांनी अतिशय चाणाक्षपणे शिंदे सेनेची निवड केली होती. ज्या भाजपच्या ताकदीवर बारणे दोनदा खासदार बनले ती भाजप व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शत्रुत्व आले होते जे तिसऱ्यांदा खासदार होण्यात अडथळा ठरू शकते हे बारणेंनी ताडले होते. त्याची पूर्वतयारी म्हणून वर्षभर आधीच आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना त्यांनी भाजपच्या मंडपात सोडले होते. ठाकरेंसोबत राहण्यात हशील नाही हे बारणेंनी जाणलं होतं.
वास्तविक मावळचे व ठाकरे घराण्याचे विशेष नाते आहे.ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेली एकवीरा देवी ही मावळात असल्याने या मतदार संघाविषयी आस्था व प्रेम या परिवारात आहे. त्यामुळे बारणे यांना टक्कर देऊ शकेल ? असा उमेदवार संजोग वाघेरे यांच्या रूपाने मिळाल्यानंतर शिवबंधन बांधत असतानाच त्यांची उमेदवारी पक्की होत जाहीरही केली गेली. वास्तविक जर संजोग वाघेरे सेनेत गेले नसते तर बारणेंना टक्कर देऊ शकेल ? एवढ्या ताकदीचा उमेदवार ठाकरे यांना मिळणे मुश्किल झाले असते या वस्तूस्थितीकडेही दुर्लक्ष करता येत नाही. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनाही ठाकरे सेनेने तयारी करण्यास सांगितले होते मात्र संजोग वाघेरे आल्यानंतर संदीप वाघेरे यांचे नाव मागे पडले.
वैशिष्ट्य म्हणजे मावळ लोकसभा मतदार संघ अस्तित्वात येऊन सलग चार वेळेस शिवसेनेलाच येथून तिकीट मिळत आलंय. आणि युती धर्माचं पालन म्हणून भाजपलाच शांत बसावं लागतंय ही जखम भाजपला अस्वस्थ करणारी ठरलीय. मात्र नाईलाज व्यक्त करण्याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पर्याय देखील नाही. २०१९ ला पार्थ पवार यांचा पराभव केल्यानंतर बारणे यांची पहिली प्रतिक्रिया जर कोणती होती तर ती म्हणजे,” मावळच्या जनतेने अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराचा पराभव केलाय.” आता अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीच्या चांगुलपणावर बारणे यांना बोलावे लागतंय…! भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरच बारणे यांची जास्त मदार व अवलंबित्व राहणार आहे, हे वास्तव आहे . कारण शिंदे यांची सेना मावळात किती ? याचा शोध या निवडणूकीपासून लागायचा आहे.वाघेरे यांना उद्धव सेनेने सांभाळलेला पंधरा वर्षे जुना हा मावळचा गड पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) , काँग्रेस आणि घाटाखालील शेकापची साथ लाभली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावंतांची ताकद हे वाघेरे यांचे बलस्थान असणार आहे. अजित पवार हे अचानक महायुतीत आल्याने बारणे यांची ताकद वाढून सध्या त्यांची पाचही बोटे तूपात आहे. बारणे यांच्या पत्रिकेतच राजयोग म्हणावा लागेल. निवडणूका आल्या की, हमखास सकारात्मक वातावरण नेहमी त्यांच्या बाजूने रहात आले आहे. यंदा मात्र मित्रपक्षांची हृदयापासून साथ बारणेंना नाही, ” आलिया भोगासी… या म्हणी प्रमाणे मनाच्या इच्छेविरुद्ध बारणेंचा जयजयकार करण्याची पाळी नियतीने त्यांच्यावर आणली आहे.
लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुका या नेहमी परस्पेशनवर ठरत असतात, पारडं कोणाचं जड किंवा हलकं हे वातावरणातील बदलणाऱ्या अंदाजावर ठरत आलंय. संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकमेव मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे परंतू २०१९ ला सुनिल शेळके यांच्या व्यक्तिगत तूफान लोकप्रियतेमुळे भाजप येथून हारली . आज त्याच सुनिल शेळके यांना नाईलाजाने बारणे यांचे काम करावं लागतंय, तीच स्थिती बाळा भेगडे यांची आहे.
२००९ ला मराठा ( बाबर) विरुद्ध आझम पानसरे (मुसलमान) असे जातीय परस्पेशन तयार झालं होतं. २०१४ ला दोन्ही उमेदवार मराठा होते( लक्ष्मण जगताप आणि बारणे) त्यावेळी सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांची छबी निर्माण झाली होती मात्र राज ठाकरे यांनी जगताप यांच्याच व्यासपीठावर “शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत “असे भाषण ठोकल्याने जगताप यांना पराभवाच्या किनाऱ्यावर हे भाषण तेव्हा घेऊन गेलं होतं. (विशेष म्हणजे हेच राज ठाकरे आता बारणेंबरोबर आहेत.)पुढे २०१९ ला थेट अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात असल्याने नवखा मितभाषी व भाषणं न येणारा कॉलेज कुमार ही छबी पार्थ यांना पराभवाकडे घेऊन गेली होती. पार्थ यांच्या विजयासाठी अजित पवारांनी आपल्या चाळीस वर्षाच्या अनुभवाचा किस पाडूनही मतदारांनी तयार केलेले पर्सेप्शन दूर झाले नाही आणि दुसऱ्यांदा बारणे मोदी लाटेत विजयी झाले होते.
यंदाही ‘बारणे पराभूत होणं शक्य आहे…’असं वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात संजोग वाघेरे आहेत. विनम्रता, सहज मोल्ड होणारा, पारदर्शक माणूस अशी वाघेरेंची प्रतिमा आहे. तर अनुभवी, मुत्सद्दी, धोरणी, प्रसंगी आपल्याला संधी दिलेल्या नेत्यालाही सोडलेले.. अशी बारणे यांची प्रतिमा आहे. अशा या दोन प्रतिमांमध्ये मतदार कोणाची निवड करतात हे पहाणं मनोरंजक ठरणार आहे.