विजय जगताप
प्रकाश जवळकर, महादेव कवितके, (सरचिटणीस) नंदू भोगले, गणेश चव्हाण, संतोष घुले, द्वारकादास कुलकर्णी, रवींद्र नांदूरकर आणि दत्तात्रय कोरडे (उपाध्यक्ष) या जुन्या भाजपच्या आठ जणांना नुकतेच भाजप पक्षसंघटनेत घेण्यात आले आहे.
जुन्या कार्यकर्त्यांना पक्षात कोणी विचारत नाही, सत्ता असूनही त्यांची फरफट होते, पक्षसंघटनेत त्यांना घेतले जात नाही, काल पक्षात आलेले आज शिरजोर झाले आहेत. आदी वेदना व ठसठसीमुळे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी पुढाकार घेऊन ‘ओल्ड इज गोल्ड’ ची उभारणी केली. काही कार्यक्रमांमधून उपद्रवमूल्य दाखविण्याचाही प्रयत्न केला. अखेर शहराध्यक्ष जगताप यांनी प्रथम दोन जणांना सरचिटणीस व नंतर सहा जणांना उपाध्यक्षपदी नेमून त्यांना पक्षसंघटनेच्या पंखाखाली घेतले. ओल्ड इज गोल्डच्या लढयाला यश आल्याच्या बातम्याही सगळीकडे आल्या.
परंतू पक्षनेतृत्व आमच्या समोर झुकले असा जर गैरसमज कोणाचा असेल तर त्याने तो प्रथम काढून टाकण्याची गरज आहे. नेतृत्वाने या आठ जणांची दखल घेतली म्हणजे ही मंडळी फार असामान्य होती म्हणून त्यांना संधी देत नव्हते असे काही नाही. राजू दुर्गे यांनी लढण्यासाठी बळ दिले, वाट तयार केली म्हणून पक्षसंघटनेत प्रवेश तरी झाला. आता वेळ आली आहे आपण ‘ओल्ड खरंच गोल्ड आहोत का? हे सिद्ध करून दाखविण्याची…!’
योगायोगाची गोष्ट म्हणजे तोंडावर आता लोकसभेच्या निवडणूका आहेत त्या होत नाही तो लगेचच चार महिन्यांनी विधानसभा निवडणूका होत आहेत. आपण पक्षसंघटनेत सरचिटणीस किंवा उपाध्यक्ष आहोत याचे भान राखणे व पक्षाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा जपणे याची काळजी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. नुसतेच व्हिजीटींग कार्ड व लेटर हेड छापून स्वत:ची प्रतिमा निर्माण होत नाही. पक्षसंघटनेत झोकून देत आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाने पक्षात नोंद घेण्याइतपत कामगिरी कशी ठसवता येईल याची दक्षता घेण्यासाठी येत्या आठ महिन्यांचा काळ म्हणजे या मंडळींना सुवर्णसंधी आहे. आपण गर्दीतला एक चेहरा न बनता आपल्या चेहऱ्याभोवती गर्दी झाली पाहिजे अशी कमाल यांना आता करावी लागेल. कारण इतिहास असा सांगतो की, मामनचंद अग्रवाल, प्रतिभा लोखंडे, दादा ढवान, वसंत वाणी ते लक्ष्मण जगतापांपर्यंत जे जे अध्यक्ष झाले तेवढेच जनतेच्या लक्षात राहिलेले आहेते.
लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांना काम करावं लागणार आहे. हे नेतृत्व काही रात्रीतून तयार झालेलं नाही. या शहरावर असलेलं शरद पवार यांचं राज्य उलथवून टाकण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. (अजित पवारांची सत्ता, असे जाणीवपूर्वक म्हणत नाही कारण शरद पवारांच्या छायेत अजित पवार तयार झालेत त्यांना शून्यातून प्रवास करावा लागलेला नाही)
एकूणच सिंहाच्या जबडयात या आठ जणांनी प्रवेश केला आहे. त्यांची संधी त्यांनाच शोधावी लागणार आहे. लक्ष्मण जगताप यांना चकीत करण्याचं व त्यांची पाठीवर थाप पडेल असा कार्यक्रम स्वत:च आखून आपण जुने आहोत हे कृतीतून व व्यवहारातून दाखवावं लागणार आहे. वेळप्रसंगी एखादया मुद्दयावर जगतापांनाही उलटा सवाल विचारण्याची क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. आज बॉटम लेवल ते टॉप लेवलपर्यंत भाजपची सत्ता आहे. दूर्देवाने पिंपरी चिंचवड भाजप पक्षसंघटनेत हुशार, कल्पक, चाकोरीबाहेर विचार करणारी तसेच सर्वच क्षेत्रात, सगळ्या पक्षांमध्ये नेटवर्क व संबंध असलेला व कुठेही विरघळणारा एकही नाही हे खेदाने नमूद करावे लागत आहे. प्रत्येकाने आपण भाजपमधले प्रमोद महाजन बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता प्रमोद महाजन कसे होते? हे शोधायला लागाल, तर मग काही खरं नाही…!