विजय जगताप
युती झाल्याने सेनेच्या ताब्यातील मावळ मिळविण्यासाठी भाजपचे खिंड लढविणे सुरूच असल्याच्या घटनेकडे व पार्थ पवारही रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाल्याने युतीत मावळ कोणाकडे जातोय? याकडे आता राष्ट्रवादीने बारीक नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे.
भाजप-सेनेच्या युतीचा निर्णय सोमवारी मुंबईत घेण्यात आला. या निर्णयाला चोवीस तासही होत नाही तोच पिंपरी भाजपच्या नगरसेवकांनी काल पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मावळची जागा भाजपलाच सोडावी व लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दयावी अशी मागणी केली होती. मावळ मतदारसंघ निर्माण झाल्यापासून सलग दोन वेळा शिवसेनेने ही जागा जिंकून ताब्यात ठेवली आहे.
युतीधर्मानुसार ही जागा पुन्हा सेनेलाच जाणार असल्याने व खासदार श्रीरंग बारणे हेच पुन्हा उमेदवार असतील यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपने चाल खेळत ही जागा मिळविण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. सर्व काही शक्य असू शकते हाच राजकारणाचा मूलाधार समजला जातो. २००९ ला मावळमधून निवडून गेलेल्या गजानन बाबर यांना पुन्हा २०१४ ला पुन्हा तिकीट नाकारण्याचे धाडस शिवसेना करू शकते तर भाजपचा प्रचंड दबाव वाढला तर ही जागा भाजपला सोडूही शकते, अशी अंधूक आशा भाजप बाळगून आहे. तर या दोघांच्या संघर्षावर राष्ट्रवादी बारीक नजर ठेवून असल्याचे चित्र आहे. आधीच सुभेदारांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला टिकेला सामोरे जावे लागत आहे. माढयामधून शरद पवार यांनी लढण्याचे निश्चित केले आहे तर बारामती मधून सुप्रिया सुळे लढणार आहे. अशातच पार्थ पवार यांना मावळातून लढण्यास सांगितले तर बाप-मुलगी-नातू तिघेही मैदानात या ट्रोलला सामोरे जाणे राष्ट्रवादीला अशक्य होईल व बदनामी, टिका, चिखलफेक होईल ही बाब निराळीच: यामुळे पार्थ पवार यांना रोखण्यात आले आहे. वास्तविक पार्थच्या निमित्ताने जमिनीचा कस तपासणे व पोलीसांच्या भाषेत ‘पेट्रोलिंग करणे’ ही शरद पवारांची जुनी सवय असल्याने तसे कोणी पार्थ यांच्या उमेदवारीकडे गांभीर्याने पाहिलेच नव्हते. आता मावळ सेनेकडे की भाजपकडे याकडे डोळे लावून बसण्याशिवाय राष्ट्रवादीला गत्यंतर नाही. जर भाजपकडे मावळची जागा गेलीच तर खासदार बारणे यांना साकडे व दंडवत घालायला देखील राष्ट्रवादी कमी करणार नाही असे सध्या तरी चित्र आहे.