( विजय जगताप)
‘आठवडे बाजार’ असं नाव पडलेल्या पिंपरी महापालिका स्थायी समितीची दर बुधवारची नियमित सभा न दबकता न बिचकता उदया( बुधवारी) घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे . तर लाच प्रकरणात पालिका सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या चार कर्मचा-यांच्या जागी बदलीसाठी कोणीच पालिका कर्मचारी इच्छुक नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे उर्वरित तीन कर्मचारीच स्थायी कार्यालयाचा गाडा तूर्तास हाकणार आहे.
महापालिका नगरसचिव विभागामार्फत पालिका पदाधिका-यांच्या कार्यालयात कर्मचारी नेमले जातात. नुकत्याच घडलेल्या ॲंटीकरप्शनच्या धाडीत स्थायी समिती कार्यालयात कार्यरत असलेल्या पालिकेच्या चार कर्मचा-यांना ( पी.ए., शिपाई , संगणक चालक, लिपिक) अटक करण्यात आली, घटनेचे गांभीर्य पाहता व महापालिका कायदयानुसार या चौघांना सेवेतून निलंबितही करण्यात आले.एरव्ही या कार्यालयात “ वाढपी” म्हणून काम करायला व येथे बदली होण्यासाठी कर्मचा-यांमध्ये चढाओढ चालायची. परंतू धाड प्रकरणामुळे पालिका विश्व व शहरातील सारे राजकारणच ढवळून निघाल्याने ‘येथे आता बदली नको रे बाबा..असा सूर पालिका कर्मचारी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे नगरसचिव विभागाने देखील अदयाप पालिका प्रशासनाकडे येथे कर्मचारी देण्याची मागणी केलेली नाही.त्यामुळे सध्या या कार्यालयात असलेले ( भोसले, भटकवाड व खामकर ) हे तीन कर्मचारीच तूर्तास तरी स्थायी समिती कार्यालयाचा गाडा हाकणार आहे.
दरम्यान, शहरच नव्हे तर राज्यभर या प्रकरणाने नाचक्की झालेल्या भाजपने या घटनेनंतर प्रथमच होणारी २५ आॅगस्टची (बुधवार) सभा नियमितपणे घेण्याचे धारिष्ट दाखविले आहे.
सभा नाही घेतली तर चूकीचा संदेश जाईल व भाजप घाबरला किंवा टेन्शन मोडमध्ये गेला असे वातावरण निर्माण व्हायला नको या मतप्रवाहावर मतैक्य झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, लाच प्रकरणाची ही घटना शहरात इतकी वेगाने पाझरली आहे की स्थायी समितीचा कारभार तसेच येथे मिळणारा पैसा सामान्यातल्या सामान्य माणसालाही कळू लागला आहे.कायदयानुसार प्रत्येक खर्चाच्या निर्णयाला स्थायीची मान्यता लागणे व मंजूरीची मोहोर( शिक्का) ठेकेदाराच्या फाईलवर उमटवावी लागण्याच्या कामात आता ऊसाबरोबर एरंडाचंही लग्न काही दिवस तरी लागणार आहे.( पैसे न देता फाईल घेऊन जाण्याचे बळ इतर ठेकेदारांना येण्याची शक्यता)
————-
भाजप सरचिटणीसाने पाच वर्षांपूर्वी स्थायीवर टाकलेला बाॅम्ब आता भाजपवरच पडलाय
———————-
राष्ट्रवादीची पालिकेत सत्ता असताना २०१६ मध्ये शहर भाजपच्या सरचिटणीसाने स्थायी समिती कारभारावर रेशन काढून गेली बावीस वर्षे एकाच जागेवर असलेले स्थायी अध्यक्षांचे पी.ए. यांची बदली पालिका प्रशासन का करू शकत नाही? असे म्हणत तेव्हा कैचीत पकडले होते.या मुद्दयाची दखल घेऊन तेथे दुसरे पी.ए. देण्यात आले. योगायोग म्हणजे हे दुसरे पी.ए.च आता लाच घेताना सापडले आहे. भाजप सरचिटणीसांना तेव्हा यश आले खरे परंतू हा डाव पाच वर्षानंतर आपल्याच पक्षावर उलटू शकतो ही सुतराम शक्यता त्यांनाच नव्हे तर कोणालाही नव्हती. आता मात्र हे सरचिटणीस मूग गिळून (प्रवक्त्याचे अधिकार असूनही) गप्प आहेत.