आंदर मावळातील दुर्दम्य परिसर असलेल्या कुसवली गावातील सहारा वृध्दाश्रमास प्रथमोपचार पेटी,सर्व आजारांवरील गोळया-औषधे आज (सोमवारी)प्रदान करण्यात आली.
मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य मेडिको,आणि पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेतला. अनाथ निराधारांसाठी असलेल्या या वृध्दाश्रमामध्ये आरोग्य व्यवस्थेची अशा प्रकारची सोय झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.
निसर्गरम्य परिसर व जंगल सदृश झाडी व पहाड असलेल्या या भागात जवळपास डाॅक्टर नसल्याने वैदयकीय सुविधेसाठी वीस किलोमीटर दूर असलेल्या टाकवे गावात जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे यांनी पुढाकार घेतला.
त्यांनी प्रथमोपचार साहित्य पेटीसह, सर्दी, खोकला, ताप,जुलाब, अंगदुखी, गॅसेस, अॅसिडिटी, अपचन, डोकेदुखी, वातविकार, गुडघेदुखी , मास्क,सॅनिटायझर, वाफ घेण्याचे मशीन यासह सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन सिरिंज आदी सर्व औषधोपचार साहित्य त्यांनी येथे उपलब्ध केले आहे.
यावेळी प्रबोधनकार शारदाताई मुंडे,भाजपा भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ शिंदे,पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे संतोष खिवंसरा व्यावसायिकमारुती हाके, पोपट बच्चे,अभिजित पाटील ,राहुल तांबोळी,संतोष कुलकर्णी, राजू कोरे,गणेश बच्चे,गिरीश हंपे,विवेक धोत्रिकर,राजेंद्र चौधरी, आदींनी या उपक्रमात मोलाचा सहभाग घेतला.
सहारा वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.