आझमभाई पानसरे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी थेट त्यांच्या घरी आज सकाळी अजितदादा पवार पोहोचले आणि शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा व अफवांची एकच लगीनघाई उडाली.
माजी महापौर व शहरातील ज्येष्ठ राजकारणी असलेले आझमभाई पानसरे यांची प्रकृती ठिक नसल्याचे समजल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी आज पुण्याहून चाकणकडे जात असताना भाईंची चौकशी करण्यासाठी आपला मोर्चा त्यांच्या घराकडे वळविला. माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
१९९२ हे वर्ष आझमभाई व अजितदादा या दोघांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे ठरले होते. भाई त्याच वर्षी महापौर झाले आणि दादा त्याच वर्षी खासदार होऊन संसदेत गेले. पुढे दादांचा परिघ वाढला व ते नेते झाले तर अनेक पराभव व दोन पक्ष बदलून भाई शहराचेच नेते उरले. मधल्या काळात थोडे अंतर येऊनही या दोघांमध्ये स्नेह व आपुलकी मात्र कायम होती. त्यामुळे २८ वर्षाचा हा जुना स्नेह आठवणींच्या धाग्यांनी भाई आजारी असल्याच्या निमित्ताने पुन्हा गुंफला. मिडियाने त्यात भर टाकून आपापल्या अंदाजाचे किल्ले लढविले व मैत्रीच्या या विणलेल्या गोफावर अंदाजाचे तरंग शहरात उमटवून टाकले.