( विजय जगताप)
विलास मडेगिरी यांना पालिकेत मारहाण झाली परंतु पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याशिवाय भाजपने काहीच केले नाही, परवा नामदेव ढाके यांची सर्वांसमोर भाजप आमदारांनी चंपी केली. त्यामुळे आता शहर भाजपमधील एक गट प्रचंड अस्वस्थ असून विशेषतः गाववाले सोडून पक्ष संघटनेत असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन भाजप आमदारांना आत्ताच रोखण्यासाठी बैठक घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
आज ढाकेंचा नंबर लागला उद्या आपलाही लागू शकतो. भाजपमधील गाववाल्या पुढार्यांच्या इगो, प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांची जर फरपट होणार असेल तर सहन न करण्याच्या निर्णयापर्यंत आता पक्ष संघटनेतील एक गट आला आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपचा इतिहास पाहिला तर इथे गटबाजीचा शाप बसल्यासारखी स्थिती आहे. मामनचंद अग्रवाल,प्रतिभा लोखंडे, वसंत वाणी, दादा ढवाण,गीता आफळे, अंकुश लांडगे, एकनाथ पवार ते विद्यमान शंकर जगताप या अध्यक्षांपर्यंत ती कायम आहे. सत्ता असो की नसो, सगळेच या पक्षात विद्वान असल्याने राज्य नेतृत्वाला कायम येथील मंडळींच्या कलेनेच घ्यावे लागत आलेले आहे. मानपानाची सर्वाधिक भूक इतर राजकीय पक्षांपेक्षा शहर भाजपमध्ये आजपर्यंत पाहायला मिळाली आहे. घरातील बायको देखील प्रसंगी मत देणार नाही, परंतु ‘पक्षात मला महत्व व स्थान मिळायलाच हवे’ अशी अपेक्षा असलेले महाभाग देखील शहर भाजपात आहे.
नुकतेच पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते व सरचिटणीस या पदावर सध्या असलेले नामदेव ढाके यांचा जाहीर पानउतारा चिंचवडच्या आमदार अश्विनीताई जगताप यांनी केला. या अवमानामागचे खरे दुखणे ढाके व आमदारांनाच ठाऊक ? परंतु तरीही ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ म्हणत ढाकेंनी हा अपमान गिळला व पचवला देखील… !
परंतू आठवडा होत आला तरी त्याचे पडसाद थांबायला तयार नाहीत. वास्तविक नुकतेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा शहरात झालेला दौरा, त्यांचे झालेले जंगी स्वागत, मावळ लोकसभा संपर्क अभियान अंतर्गत त्यांनी एकाच दिवशी घेतलेले विविध कार्यक्रम व शंकर जगताप यांच्याकडून झालेले नेटके नियोजन यामुळे शहरात जोश व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.
शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून शंकर जगताप यांची कार्यशैली, संवाद आणि संपर्कावर पक्ष संघटनेत सगळेच चांगले बोलत आहेत. कोणतरी मिश्रा नामक धार्मिक व्यक्तीचा सांगवीतील खाजगी कार्यक्रम चार दिवस घेऊन व ‘घर चलो अभियान’ यामुळे शंकर जगताप यांची प्रतिमा उंचावली असल्याची कबूली त्यांचे विरोधक ही मान्य करतात. भाजपला मानणारा बहुसंख्य मतदार चिंचवड मतदार संघात सर्वाधिक संख्येने आहे. मात्र पक्ष संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्तेच पक्षाचा कार्यक्रम व अजेंडा राबविण्यात सर्वाधिक मागे असल्याची देखील चर्चा आहे. दगड जरी आमदार म्हणून उभा केला तरी त्याला मतदान करण्याची भाजपला मानणाऱ्या बहुसंख्य मतदारांची येथील भावना आहे. वास्तविक या मतदारांमुळेच निर्जीव व नाठाळ कार्यकर्त्यांचे दुकान चालते ही देखील वस्तुस्थिती आहे.
परवा बावनकुळे यांना ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ समजले यातच सर्व काही आले. एकूणच भाजपमध्ये असलेली ही सुंदोपसुंदी रोखणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही ,परंतु ढाके यांच्या प्रकरणावरून आता सहन करायचं नाही तर एकत्र यायचं यावर सर्वांची ‘मन की बात ‘एकच असल्याचे दिसून आलं आहे.