विजय जगताप
शत्रुला घेरणे, नामोहरम करणे यासाठी त्याच्या बालेकिल्ल्यात घुसून तटबंदीत प्रवेश केल्याच्या घटना इतिहासात सापडतात. असाच काहीसा प्रकार मागील साडेचार वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील मैदानाबाबत घडत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने १० जानेवारीपासून सुरू केलेली ‘निर्धार परिवर्तन यात्रा’ येत्या शनिवारी (ता. २) पिंपरी चिंचवड शहरात येत आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेली सभा नेमकी सांगवी येथील पी.डब्लू.डी. च्या ग्राऊंडवर घेण्यात आली आहे. हा परिसर शहर भाजपचे अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत मावळसाठी लक्ष्मण जगताप यांनी शेकापच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकले होते. राष्ट्रवादीला हा जबर धक्का होता. अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीने जगताप यांना उत्तर देण्यासाठी याच भागात शरद पवार यांची सभा लावली. पुढे २०१४ च्याच ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीतही याच भागात अजित पवार व अन्य नेत्यांच्या सभा झाल्या. शिवसेनेनेही मग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा याच ठिकाणी लावली होती. त्यामुळे हा परिसर व हे मैदान जाणिवपूर्वक लक्ष्मण जगताप यांना आव्हान देण्यासाठी वापरण्यास सुयवात झाली. तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेलाही सांगवीचीच पसंती देण्यात आली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पार्थ अजित पवार यांचे नाव चर्चेत आहे. मागील ८ डिसेंबर २०१८ रोजी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी सांगवीतच आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये प्रथमच शहरवासियांना पार्थ पवार यांचे दर्शन घडले होते.
दरम्यान यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते फैजल शेख यांच्याशी बातमी खासच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, ते म्हणाले की, या यात्रेसाठी आम्ही भोसरीतील गावजत्रा मैदान व सांगवीतील मैदान असे दोन पर्याय ठेवले होते. परंतू भोसरीत इंद्रायणी थडी भरत असल्याने सांगवीतील मैदान निवडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचा हा गड आहे म्हणून हे मैदान निवडले का? या दुसऱ्या प्रश्नावर शेख म्हणाले की, ‘हे देखील एक कारण आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले.