पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये (वायसीएम) शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीमध्ये डॉक्टर व एजंट मंडळींची असलेली रिंग मोडून काढत गोरगरीब नागरिकांची लयलूट थांबवावी, अशी मागणी युवा सेनेचे शहरप्रमुख अभिजीत गोफण यांनी आज केली.
वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठातापदाची सुत्रे नुकतीच डॉ. राजेश वाबळे यांनी स्विकारली. त्यानिमित्त आज श्री. गोफण यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन रुग्णालयाशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन त्यांना यावेळी दिले.
राज्याच्या विविध भागातून गोरगरीब रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी साहित्य लागते ते साहित्य पुरविण्यासाठी एजंटाचा मोठा सुळसुळाट वायसीएममध्ये झाला आहे. तो बंद व्हावा, तसेच प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याने पीआयसीयू (PICU) विभाग सुरू व्हावा, डॉक्टरांची संख्या वाढवावी आदि मागण्या श्री. गोफण यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
यावेळी, युवा सेनेचे आशीष क्षिरसागर, सोहित लोणारे, आकाश शिंदे, राकेश कदम आदी उपस्थित होते.