लोकसभा घशात आणि विधानसभा तोंडावर असल्याच्या पार्श्वभूमीवर जाती पातीचे गणित साधणे आणि गट-तटामध्ये संतुलन राखण्यासाठी फडणवीस सरकारने महामंडळावरील पदांची घागर रिकामी करताना पिंपरी चिंचवडमध्ये हात सैल केल्याचे स्पष्ट झाले आहे.
काल रात्रीपासून सोशल मिडियावर व पुण्यातील एका वृत्तपत्रात आज महामंडळावरील पदांच्या नेमणूकींचे वृत्त झळकले आणि अभिनंदनाच्या वर्षावाने आज दिवसभर इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअपच्या भिंती रंगू लागल्याचे दिवसभर दिसत होते. वादग्रस्त पद ठरलेल्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर अमित गोरखे यांची अध्यक्षपदी तर सदस्यपदी मनोज तोरडमल यांची नियुक्ती झाल्याचे संदेश झळकत होते. तर चित्रपट महामंडळावर तेजस्विनी कदम, म्हाडाच्या उपाध्यक्षपदी सेना नगरसेवक राहुल कलाटे, तर सदस्यपदी भाजपचे चेतन भुजबळ या साऱ्या पिंपरी चिंचवडच्या मंडळींनी सोशल मिडिया आज व्यापून टाकला.
मागील महिन्यात मुद्रा लोनच्या समन्वयकपदी भाजपच्या संजीवनी पांडे यांची नियुक्ती झाली. तर २६ डिसेंबर २०१८ ला साहित्य संस्कृती मंडळावर सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे व आसाराम कसबे यांची नियुक्ती झाली होती. तर मागील आठवडयात खादी ग्रामोद्योगमध्ये डॉ. हेमंत तापकीर यांच्या नियुक्तीचे होर्डिंग्ज झळकले होते. ५ सप्टेंबर २०१८ रोजी क्रिम पद म्हणून ओळखला जाणाऱ्या नवनगर विकास प्राधिकरणावर सदाशिव खाडे यांची वर्णी लागली होती. तर भाजप सत्तेच्या सुरवातीच्या अवघ्या सहाच महिन्यात ॲड. सचिन पटवर्धन यांची राज्य लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
एकूणच शहरात आता व्हीआयपींची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र असून पिंपरी चिंचवडवर झालेली ही पदांची बरसात आश्चर्यचकीत करणारी ठरली आहे.