विजय जगताप
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपच्या चार सदस्यांची आज झालेली निवड पाहता यंदाचे सभापतीपद भाजपच्या जुन्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.
२०१७ मध्ये प्रथमच भाजपाकडे महापालिकेची सूत्रे ताब्यात आली. आमदार लक्ष्मण लगताप व आमदार महेश लांडगे या दोन कारभाऱ्यांच्या समर्थक नगरसेवकांना महत्त्वाची पदे मागील दोन वर्षात दिली गेली आहेत. सत्तेचा समतोल दिसावा व शहराच्या सर्व भागातील नगरसेवकांना न्याय मिळावा, पद वाटपात समान संधी मिळावी याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला आहे.
महापौरपदी प्रथम वर्षी नितीन काळजे व नंतर राहुल जाधव या भोसरी विधानसभा क्षेत्रातील व आमदार लांडगे यांचे खंदे समर्थक असलेले परंतु या नव्याने भाजपमध्ये आलेल्यांना संधी मिळाली आहे.
तर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रथम वर्षी सीमा सावळे व नंतर ममता गायकवाड या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थकांना संधी दिली गेली आहे. विशेष म्हणजे आमदार जगताप यांनी स्थायीची सलग दोन वर्षे अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिलांना सभापती होण्याचा मान मिळवून दिला आहे.
आगामी काळ लोकसभा व पाठोपाठ विधानसभा निवडणूकीचा असल्याने आता भाजपच्या जुन्यांपैकी एकाला स्थायी समिती अध्यक्षपद मिळेल असा अंदाज आहे.
दरम्यान राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार यंदाचे स्थायी समिती अध्यक्षपद मूळ भाजपच्या असलेल्या जुन्या कार्यकर्त्यापैकी एकाला मिळण्याची दाट शक्यता असून आज झालेल्या सदस्य निवडीमध्ये भोसरी व चिंचवड या दोन्ही मतदारसंघातील जुन्यांना समितीवर आणले गेले आहे. त्यापैकी कोणाचा नंबर लागणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.
चावी मिळाली तरी तिजोरी उघडणे अवघड – नव्या अध्यक्षांची निवड ७ मार्च रोजी होणार असून नव्या अध्यक्षांना खुर्चीवर बसायला आणि आचारसंहिता यायला एकच वेळ येणार आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकादेखील होणार आहेत. निवडणूक आयोगांच्या निर्देशानुसार नियमाप्रमाणे ४५ दिवस अगोदर आचारसंहिता लागू होते. त्यामुळे दोन्ही निवडणुकांसाठीचे मिळून किमान शंभर दिवस कामेच करता येणार नसल्याने उरलेल्या आठ-साडेआठ महिन्यात नवे अध्यक्ष ६१८३ कोटी रुपयांच्या बजेटसाठी किती जोरात ‘बँटिंग’ करणार हा देखील प्रश्नच आहे.