( विजय जगताप)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका आणि पुतण्यामध्ये पडलेल्या उभ्या फुटीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिल्याने पिंपरी विधानसभेची समीकरणे आता बदलली आहेत.
पानसरे यांचे प्रभावक्षेत्र म्हणून पिंपरी मतदारसंघाकडे पाहिले जाते. आगामी विधानसभा निवडणुका निर्धारित कालावधीत म्हणजेच ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार की लोकसभेबरोबर एकत्र होणार, हे अद्याप निश्चित नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे सरकार मध्येच गडगडणे ही देखील टांगती तलवार सध्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष प्रेम असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील समीकरणेही पक्षात पडलेल्या फुटींमुळे बदलली आहेत .ज्येष्ठ नेते पानसरे हे सध्या राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी आदरयुक्त दरारा व वलय त्यांचे अद्यापही कायम आहे. पानसरे यांचा पाठिंबा किंवा अदृश्य हात जरी पाठीमागे असला तरी लोकसभा अथवा विधानसभा लढविणाऱ्यांसाठी ते मोठे बळ समजले जाते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे यांच्या अनुक्रमे पहिल्या खासदारकीला व भोसरीतून अपक्ष विधानसभा निवडणुकीला त्याची प्रचिती शहराने अनुभवली होती. तसेच २०१७ मध्ये पानसरेंनी भाजपला साथ दिल्याने पालिकेवर भाजपचा झेंडा देखील फडकणे सोपे झाले होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी सुलक्षणा धर यांना जाहीर झाली होती मात्र दुसऱ्याच दिवशी आण्णा बनसोडे यांनाही पक्षाने ए बी फॉर्म देऊन गनिमी कावा करण्यास अजित पवारांनी भाग पाडले होते. त्यावेळी आझमभाई पानसरे यांचा आशीर्वाद मिळवण्यात बनसोडेंनी यश मिळवल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.
या सगळ्या घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पानसरेंची नेमकी भूमिका व पाठिंबा कोणत्या गटाला याच विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. आता पानसरेंमुळे त्यांचा ‘होल्ड’ असलेल्या पिंपरी विधानसभेची गणिते बदलली आहेत. सुलक्षणा धर यांनी आगामी विधानसभा लढविण्यास जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.आता शहरात पानसरे यांची ताकद मिळाल्याने शहरातील शरद पवार गटाचे अस्तित्व निर्माण तर झाले आहेच शिवाय शहरातील पिंपरी ,भोसरी व चिंचवड या विधानसभा निवडणुकीसाठी हुरूप, उत्साह व ताकद प्राप्त झाली आहे.