विजय जगताप –
अचूक टायमिंग साधणे आणि निशाना थेट वर्मावर साधणे अशी संधी राजकारणात फार क्वचित मिळते. संधीची प्रतिक्षा करायची नाही तर आपणच तयार करायची आणि त्या संधीचं सोनं करायचं, असा डाव आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडीच्या माध्यमातून टाकला. कुस्तीच्या डावात तरबेज असलेल्या महेशदादांनी राजकारणाच्या डावातही अशी काही गणिते या थडीच्या माध्यमातून साधली की जिंकलेल्या पैलवानाला म्हणतात तसे म्हणावे लागेल, ‘मान गये उस्ताद..!’
‘आमदार महेश लांडगे यांना ताकद देणार’ असे जाहीर वक्तव्य ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी इंद्रायणी थडीत करणं आणि साक्षात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या थडीच्या समारोपाला उपस्थित राहणं या म्हटल्या तर साध्या आणि बारकाईने विचार केला तर फार मोठ्या घटना आहेत.
२०१४ साली अपक्ष आमदार निवडून आलेल्या महेश लांडगे यांचा राजकीय पोत जवळून माहिती असणाऱ्यांना त्यांच्या नगरसेवक झाल्यापासूनच्या कामाच्या अनोख्या स्टाईलने व अंदाजानेच ‘ये लंबी रेस का घोडा है’ असं वाटत आलं आहे. या शहराच्या लोकवस्तीचा बाज व आलेख पाहिला तर भोसरी भागात राज्याच्या विशेषत: मराठवाडा भागातून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे इंद्रायणी थडीची कल्पना सुचल्यानंतर त्यामधील प्रत्येक कार्यक्रमाच्या थीमनुसार व आपल्या भागातील लोकांचा कल व आवड लक्षात घेऊन आखलेले नियोजन इतके परफेक्ट व सूत्रबद्ध होते की शत्रूलाही या उत्तम नियोजनाबद्दल दाद देण्याचा मोह आवरता येणार नाही.
पंकजा मुंडेंनाच उद्घाटनासाठी आणणं यामधून त्यांनी आपल्या मतदारांच्या भावनिक जवळीकतेशी तर साद घातलीच आहे, शिवाय दादांनी त्यांच्या बरोबर असलेल्या मैत्रीच्या नात्याचाही अचूक टायमिंग साधला आहे. तर गायन, संगीत, फॅशन, कला यामध्ये विशेष रूची व आवड असलेल्या अमृता फडणवीस यांना या थडीमध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांच्या बक्षिस वितरणासाठी आणून दादांनी योग्य वेळ साधून मुख्यमंत्री दरबारी आपले किती वजन आहे याचाही वस्तुपाठ शहराला दाखवून दिला आहे. कारण बातमी खास रिसर्च टिमच्या अंदाजावरून गेल्या सहा महिन्यांपासून अमृता फडणवीस यांनी सार्वजनिक कार्यक्रम जवळ जवळ बंदच केले आहेत. परंतू मुख्यमंत्र्यांशी असलेले ‘अच्छे संबंध’ यामुळे मॅडम दिर्घ काळानंतर भोसरीत येऊ शकल्या आहेत आणि हे गणित सोडवण्यात महेशदादा यशस्वी झाले आहे.
ही इंद्रायणी थडी होण्याच्या अगोदरच आम्ही ही थडी सर्वांना धडकी बसविणार असे भाकीत केले होते. या थडीला मिळालेला अलोट प्रतिसाद, प्रचंड गर्दी, पाच वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षाच्या महिला तसेच वृद्धापर्यंत सर्वांना सामावून घेणारा हा सोहळा दादांनी व त्यांच्या टिमने संस्मरणीय करून टाकला. या थडीच्या लोकप्रिय होण्यामागे महेश दादांचा असलेला ‘जॉलीनेस स्वभाव’ व तरूणाईचे त्यांच्यावर फिदा असणे याचाही तितकाच वाटा आहे.
आमदारकीसाठी अपक्ष लढत असताना याच मैदानावर शेवटची जाहीर सभा घेऊन दादांनी मैदान मारले होते आणि आताही काही महिन्यांवर आलेल्या निवडणूकीसाठी त्यांनी हा शहरातला आजपर्यंतचा सर्वात ‘सक्सेस-कामयाब’ इव्हेंट घेऊन आपली घडी बसवून टाकली आहे.