( विजय जगताप)
आपल्याच पक्षाच्या भूमिकेविरोधात छुपा पंगा व आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात थेट दंड थोपटलेल्या नगरसेवक रवी लांडगे यांनी आर्थिक बचतीचे कारण देत बरोबर ‘नथीतून तीर’ मारला आहे.
शहरातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता पूर्वतयारीचा भाग म्हणून स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे १० एप्रिलला केली होती. पाठोपाठ लगेच मग अजून एक जम्बो कोविड सेंटर सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावरही सुरू करावे अशी मागणी चिंचवडकर आमदार गोटातील नगरसेवकांकडून झाली. प्रशासनाने त्यावर दोन्ही ठिकाणच्या तयारीला ( वाॅटरप्रुफ मंडप, विद्युतसंच उभारणी) सुरूवातही केली व रितसर निविदा प्रक्रिया सुरू असतानाच भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी त्यास हरकत घेत नुकतेच आयुक्तांना एक पत्र दिले आहे.
दोन्ही ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारून कोट्यावधी रूपये विद्युत संच तसेच उभारणीच्या कामात घालविण्यापेक्षा शहरातील शाळा, मंगल कार्यालये अन्य इमारती यांचा उपयोग करावा व तेथे कोविड सेंटर उभारावे असे त्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीची पालिकेत सत्ता असताना व भाजपची सत्ता आल्यानंतरही एखादया प्रादेशिक वादासारखे भांडण नेहमी या दोन मैदानांवरून आजवर होत आले आहे.समजा भोसरीत पवनाथडी होणार असेल किंवा पालिकेचा अन्य कुठला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा म्हटला की चिंचवड पट्ट्यातील नगरसेवक नाराज होऊन सांगवीच्या मैदानाचा हट्ट धरायचे.
२०१७ पासून पालिकेत भाजपचे सत्ताधारी दोन आमदार असल्याने तर हद्दवाटपाचा जणू अलिखित करारच झाला होता.
अशातच आता दोन्ही ठिकाणच्या प्रत्येकी ४०० बेडच्या कोविड सेंटरलाच रवी लांडगे यांची विरोध करण्यामागची भूमिका वरकरणी संयुक्तिक व पटणारी वाटत असली तरी श्रेयवादाची लढाई व आपल्या शत्रूंच्या वर्चस्व व नाव होण्याच्या मार्गात कोलदांडा आडवा घालण्याचा तो गनिमी कावा असल्याचे बोलले जात आहे.
रवी लांडगेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनीही आता सेम मागणी करून लांडगे यांच्या सूरात सूर मिसळला आहे .आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर विरोधक म्हणून काटेंची ओळख आहे.जगतापांच्या भूमिकेला व धोरणाला नाना काटे कायम विरोध करत आले आहेत.
त्यात अजून भर म्हणजे सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनीही आज रवी लांडगे, नाना काटे यांच्यासारखीच भूमिका मांडत मैदानांवरील जम्बो कोविड सेंटरला विरोध केला आहे.