( विजय जगताप)
पक्ष संघटनेत कोणाचाच कोणाला कसलाच धरबंध नसलेलं कोरोना काळातील बेशिस्त काम जर पहायचं असेल तर पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेकडे बोट दाखवावं लागेल.
संघटना म्हणून शहरात तोळामासा असलेला जीव व हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी इन मीन नगरसेवक संख्या असलेल्या शिवसेनेने नुकतीच शहर प्रमुख म्हणून ॲड सचिन भोसले यांची नियुक्ती केली. तर मावळते शहरप्रमुख योगेश बाबर यांना बढती देत कोणाच्याच लक्षात राहणार नाही असे पद त्यांच्या गळयात मारले. ही खांदेपालट करताना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू असलेले गजानन चिंचवडे यांचे जिल्हाप्रमुख पद मात्र कायम ठेवले गेले.
महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपने रावेतला तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी वैयक्तिकरित्या पिंपळे गुरव येथे कोविड सेंटर उभारल्यानंतर शिवसेनेचंही काम दिसलं पाहिजे म्हणून खासदार बारणे यांनी निगडी येथील लोकमान्य हाॅस्पिटलच्या सहकार्याने कोविड सेंटर उभारले. मात्र हे सेंटर उभारताना शिवसेनेच्या वतीने नव्हे तर खासदार श्रीरंग बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने कोविड सेंटर असे त्याचे नामकरण करण्यात आले.पाठोपाठ दोनच दिवसांनी शहर प्रमुख सचिन भोसले यांनी शिवसेनेच्या वतीने थेरगाव येथे ७० बेडचे मातोश्री कोविड उभारले.
वास्तविक शहर म्हणून एकरूपता व एकसंधता साधण्यासाठी खासदारांनी शिवसेनेच्या वतीने कोविड सेंटर उभारलं असतं तर ते संयुक्तिक ठरलं गेलं असतं, परंतू तसं झालं नाही.
दुसरा प्रकार म्हणजे नुकतंच सत्ताधारी भाजपने दडपण्याचा प्रयत्न केलेलं १ लाख रूपयात बेड हे प्रकरण भाजपच्याच दोन नगरसेवकांनी उजेडात आणलं.या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांनी पक्षाची भूमिका म्हणून त्वरीत पोलीस आयुक्तांची व महापालिका आयुक्तांची भेट घेत कारवाई करण्याचं निवेदन दिलं.शहरातील अन्य कुठल्या पक्षांनी भूमिका घेण्याअगोदर सेनेने उचलेले हे पाऊल चर्चेत आलं असताना खासदार बारणे यांनी याच विषयावर आयुक्तांना पत्र देत कडक कारवाईची मागणी केली.
वास्तविक इतर पक्षांपेक्षा सेनेत संघटनेला अधिक महत्तव आहे . जर भोसलेंनी संघटना म्हणून पत्र दिलेच आहे तर खासदारांनी पुन्हा त्याच विषयावर पत्र देणे याचा उलगडा होत नाही.
एकूणच होश आणि जोश गमावून बसलेले व आक्रमकपणाच विसरून गेलेले नामधारी शिवसैनिक सध्या शहरात आहेत.शिवसेनेतील कामकाजाची ही विस्कळीत घडी आता लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक स्तरावर काम करायचे की संघटनेला धरून गाडा हाकायचा यावर विचार करण्याची वेळ शिवसैनिकांवर आली आहे.
मोठ्या महत्पयासाने शिवसेना गटनेतेपदावर चार वर्षे राहुल कलाटे यांनी रोवलेला खुंटा उखडण्याचे काम होऊन महिना होऊनही अजून या पदावर येथे कोणाला नेमायचे हा निर्णय शिवसेना घेऊ शकलेली नाही, अशातच सेनेने पालिकेत सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणे म्हणजे कळसच म्हणावा लागेल.