( विजय जगताप)
मोफत असलेल्या आयसीयू बेडसाठी १ लाख रूपये घेतल्याच्या प्रकारावरून शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या रडारवर आलेल्या स्पर्श हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी आपली बदनामी झाल्याचा तक्रार अर्ज आज पिंपरी पोलिस ठाण्यात दिला.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्र लिहून राष्ट्रवादीचे एक माजी महापौर, भाजपच्या दोन नगरसेविका तसेच अन्य काही नगरसेवक यांची आपण अपेक्षापूर्ती केली नसल्यानेच आपणाविरूध्द हे कुभांड रचल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
कालच( शुक्रवारी) झालेल्या पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवक स्पर्श हाॅस्पिटलच्या कारभारावर तुटून पडल्याने बेडसाठी पैसे घेतल्याच्या या प्रकारावरून महापौर उषा ढोरे यांनी दोषींवर गुन्हा दाखल करावा व पालिकेने उभारलेल्या दोन्ही जम्बो कोविड सेंटरचे काम काढून घ्यावे असा आदेश प्रशासनास दिला होता.
दरम्यान, स्पर्श हाॅस्पिटलच्या संचालकांनी व पैसे घेतल्याचा आरोप असलेल्या डाॅक्टर प्रविण जाधव यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात असे काही झाले नाही असे म्हणत आपली बदनामी केल्याचा तक्रार अर्ज आज दाखल केला. शिवाय स्पर्श संस्थेचे प्रमुख डाॅ अमोल होळकंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडत पालिकेचे अधिकारी व नगरसेवक आपल्याला कसा त्रास देतात याचा सविस्तर वृत्तांत मांडल्याने या प्रकरणास आता एक वेगळीच रंगत आली आहे.
यासंदर्भात हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलेले भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्याशी बातमी खासने संपर्क साधून संपूर्ण घटनेचा वृत्तांत जाणून घेतला असता त्यांनी आपल्याकडे असलेले पुरावे व या घटनेची सारी माहिती दिली.
गायकवाड म्हणाले,२७ एप्रिलला माझ्या शिक्षिका असलेल्या वाबळे बाई अत्यवस्थ असून त्यांना आयसीयू बेड पाहिजे असा काकूळतीचा फोन त्यांचा मुलगा प्रसादने मला फोन केला.मी तातडीने ॲटो क्लस्टर कोविड सेंटरचे प्रमुख डाॅ होळकुंदे यांना फोन लावला परंतू बेड नसून ५-६ जण बेडसाठी वेटींग वर असल्याचे त्यांनी उत्तर दिले, नेहरूनगरच्या जम्बो कोविड सेंटरला मिळू शकेल असा मला त्यांनी सल्ला दिला.मी हताश झालो. दोन अडीच तासांनी मला प्रसादचा फोन आला. ‘ ॲटो क्लस्टरमध्ये बेड मिळाला व सोय झाल्याचे त्याने सांगितले.मला शाॅकच बसला. एक नगरसेवक असून मला नकार मिळाला आणि नंतर तेथेच बेड मिळतो याचे नवलही वाटले. पण सोय झाली याचे समाधान वाटले.परंतू दुस-या दिवशी बाईंचे निधन झाल्याचे कळाल्याने वाईट वाटले.
जेव्हा मी अंत्यविधीसाठी गेलो तेव्हा एक जणाने मला कानात प्रसाद कडून बेडसाठी १ लाख घेऊनही बाई वाचल्या नाहीत असे सांगितल्याने मी हादरून गेलो. मी त्वरीत प्रसाद व त्याचा मेव्हणा यांना बाजूला घेऊन विचारले असता त्यांनी वाल्हेकरवाडीतील पद्मजा हाॅस्पिटलचे डाॅक्टर सचिन कसबे यांना १ लाख दिले होते त्यामोबदल्यात त्यांनी ॲटो क्लस्टरमध्ये बेड मिळवून दिला अशी माहिती दिली.मग मला हे सहन झाले नाही. माझे सहकारी नगरसेवक विकास डोळस यांना घेऊन आम्ही ॲटो क्लस्टर गाठले.वेटींग असताना त्या दिवशी बाईंचे ॲडमिशन कसं झालं? असा जाब विचारला.रजिस्टर चेक केले .६ पेशंट वेटींग असतानाही आॅक्सिजनचा बेड बाईंना देण्यात आला होता.त्या रजिस्टर बुकचे आम्ही फोटो काढले.तसेच त्या दिवशीच्या सीसीटिव्ही फुटेजची आम्ही मागणी केली परंतू ते देण्यात आले नाही. मग पालिकेत येऊन आयुक्तांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली . नंतर लगेच पद्मजा हाॅस्पिटल गाठले. तेथील डाॅ कसबे यांनी पैसे घेतल्याचे मान्य केले स्पर्शच्या ताब्यात असलेल्या अॅटो क्लस्टर कोविड सेंटरचे डाॅ प्रविण जाधव यांना त्या पैशामधून ८० हजार दिले अशी माहिती कसबे यांनी दिली मग पुराव्यासाठी आम्ही त्यांचा व्हिडीओ काढला. आमचे नेते आमदार महेश लांडगे यांना आम्ही हा प्रकार सांगितला, आमदारांनी आम्हाला “बिनधास्त लढा, सत्याच्या बाजूने रहा, मी तुमच्या पाठिशी आहे “ असा सल्ला दिला.हे प्रकरण काल उजेडात आल्यानंतर पालिका सभागृहातही आम्ही हे मांडले. यामुळे शहराची व महापालिकेची मोठी बदनामी झाली असून गेले दिड वर्ष महापालिका कोरोना रूग्णांसाठी करत असलेल्या कोट्यावधी रूपयांच्या खर्चावर पाणी पडले असल्याची भावना नगरसेवक गायकवाड यांनी शेवटी व्यक्त केली.