लोणंद( सातारा) येथील सोना अलाईज या कंपनीने प्राणवायू निर्मिती प्रकल्पाच्या मागणीसाठी वीजेचा जोडणार वाढवून मागितला असता अवघ्या चोवीस तासात ऊर्जामंत्री डाॅ नितीन राऊत यांनी त्यास मंजूरी दिली.
त्यामुळे येथे १५ टन आॅक्सिजन निर्मितीच्या कामातील अडथळा अखेर दूर झाला .
कोरोना संसर्ग वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ पालक मंत्री बाळासाहेब पाटील विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
लोणंद एमआयडीसीतील सोना अलॉइज या कंपनीमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे. प्रतिदिन १८०० सिलेंडरचा निर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे टंचाई काळात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत होणार आहे.
याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, सारंग पाटील, सातारा जिल्हा कोरोना समन्वय समिती सदस्य डॉ. नितीन सावंत, दत्तानाना ढमाळ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.