विजय जगताप –
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदारांच्या केलेल्या अंतिम यादीमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाने बाजी मारली असून जिल्हयात हा मतदारसंघ सर्वात मोठया मतदारांचा ठरला आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादयांचा पुर्नरिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. नवीन नावे नोंदविणे, चूकीची दुरूस्ती, पत्ता बदल, मयत मतदारांचे नाव वगळणे आदी प्रक्रिया परवा ३१ जानेवारीला पूर्ण झाली. त्यानुसार सर्वात जास्त मतदारसंख्या चिंचवड विधानसभेची झाली असून ४ लाख ७७ हजार ४० इतके आता येथील मतदार असणार आहेत. तर सर्वात कमी मतदारसंख्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठ मतदार संघाची असून तेथे फक्त २ लाख ८५ हजार ९८९ मतदार आहेत. चिंचवड मतदारसंघातील, रावेत, किवळे, पुनावळे, वाकड आदी भागात झालेल्या टोलेजंग इमारती व तेथे रहावयास आलेल्या मतदारांमुळे चिंचवडची संख्या जास्त झाली आहे. गेल्या दोन वर्षातील या भागातील नागरीकांच्या लोकवस्ती वाढीचा वेग ६० टक्के इतक्या वेगाने असल्याने हा मतदारसंघ मतदारांच्या संख्येने मोठा झाल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्याने ‘बातमी खास’शी बोलताना सांगितले.