विजय जगताप –
‘न भूतो’ ‘न भविष्यती’, ‘बाप.. रे’, ‘नादच खुळा’.. असे सर्वांना म्हणायची पाळी आणली आहे आमदार महेश लांडगे यांनी…! येत्या ८ तारखेपासून भोसरीतील गावजत्रा मैदानावर भरणाऱ्या या ‘बिग बजेट’ इंद्रायणी थडीने भव्यता व दिव्यतेमध्ये कुठलीच कसूर ठेवली नसून ४०० जणांची टिम अहोरात्र यासाठी राबत असल्याचे चित्र आहे.
डोळे दिपवून टाकणारे ‘हटके प्रोग्रॉम’ आयोजित करणे ही आमदार महेश लांडगे यांची खासियत आहे. इव्हेंट कसा असावा यामध्ये ते ‘बाप’ समजले जातात. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आपल्या मतदारसंघातील सर्व भाजपच्या नगरसेवकांना शिवनेरी गडावर नेऊन जनसेवेसाठी बांधील राहण्याची शपथ घेणारा सोहळा असो की, नितीन काळजे यांची महापौर पदाची दमदार मराठमोठी एन्ट्री बैलगाडीतून थेट पालिकेत येण्याची असो… एक खास अंदाज त्यांच्या कार्यक्रमातून आजपर्यंत दिसत आला आहे.
नुकतीच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केली जाणारी ‘पवना थडी’ सांगवी येथे पार पडली. ही पवना थडी पालिकेने सुरू केली तेव्हापासून ती गेली ११ वर्षे सांगवी व पिंपरी येथील मैदानांवरच फिरत्या रंगमंचाप्रमाणे भरत आली आहे. २०१५ साली फक्त एकदाच भोसरीला पवना थडी भरली गेली. पालिकेची ही पवना थडी असल्याने ती कायमच वादाच्या, गलथानपणाच्या भोवऱ्यात सापडत आली आहे.
यंदाचे वर्ष लोकसभा व विधानसभा निवडणूका पाठोपाठ तोंडावर आल्याने आपल्या प्रतिमेला साजणारी इंद्रायणी थडी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर स्वखर्चाने भरवित असल्याची घोषणा आमदार महेश लांडगे यांनी २१ जानेवारीला केली.
आणि सुरू झाला प्रवास भव्य-दिव्यतेचा..! भोसरी येथील गावजत्रा मैदान त्यासाठी निवडण्यात आले असून महिला तसेच बचतगटांसाठी १० बाय १० चे ४२५ स्टॉल त्यामध्ये असणार आहेत. नुसतीच बचतगटांनी बनविलेल्या वस्तुंची विक्री असे स्वरूप न ठेवता बालजत्रा, ग्रामसंस्कृती दर्शन, साहसी खेळ, चित्रकला, कॅलिग्राफी, जादूगरचे खेळ, महिला व युवतींसाठी झुंबा, ॲरोबिक्स या प्रकारांबरोबरच रांगोळी स्पर्धापासून पैठणी पटकावण्याऱ्यापर्यंत विविध स्पर्धा, रोजगार मेळावा, आरोग्य तपासणी व उपचार शिबीर, अशा २० भव्य कार्यक्रमांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पुण्यात भरणारी भीमथडी असो की पिंपरीतील पवना थडी या नेहमी तरतऱ्हेच्या खादयपदार्थाची चंगळ व जिभेच्या चोचल्यांसाठी ओळखल्या जातात. इंद्रायणी थडी मध्ये देखील व्हेज-नॉनव्हेज खादयपदार्थांचा ‘कल्ला’ असणार असून यावर ताव मारण्यासाठी फक्त त्या त्या पदार्थासाठी पैसे दयावे लागणार असून बाकी सहभाग, प्रवेश, फिरणे, मोफत आनंद लुटणे, या साऱ्या गोष्टी फ्री आहेत.
या इंद्रायणी थडीसाठी करावयाच्या जाहिरातींमध्ये कुठल्याही प्रकारची कसूर ठेवली नसून होर्डिंग्ज, बॅनर, हॅन्डबिल, वृत्तपत्र जाहिरात, सोशल मिडियातून ऑडिओ, व्हिडिओ प्रचार प्रसार याद्वारे केली जात असून या थडीची उत्सुक्ता केवळ पिंपरी चिंचवडच नव्हे तर जिल्हयापर्यंतच्या लोकांना लागली आहे. तर भोसरीतून आमदारकी लढविण्याचे मनसुबे रचणाऱ्यांना या थडीमुळे ‘धडकी’ भरली आहे.