विजय जगताप –
आपल्या धाडसी, शूर, पराक्रमी कार्यामुळे १७ व्या शतकात राज्यकारभार चालविताना प्रजेला न्याय देणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पिंपरीतील पुतळ्याला आता न्याय मिळतो आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर मोरवाडी चौकात अहिल्यादेवींचा मेघडंबरी अर्ध पुतळा आहे. धनगर समाजबांधवाचे श्रद्धास्थान असलेला हा पुतळा १९८५ साली अहिल्यादेवी चैतन्य मंडळाने महापालिकेडे सुपूर्द केला होता. सद्यस्थितीत मेट्रोचे बांधकाम सुरू असल्याने व मेट्रोचे पिंपरी स्थानक नेमके या पुतळ्याच्या जागी उभारण्याचा निर्णय मेट्रोने घेतल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
यावर तोडगा काढण्यासाठी महापौर राहुल जाधव यांनी मागील आठवडयात मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. काल (मंगळवारी) पुन्हा या प्रश्नी पालिकेत पिंपरी चिंचवड धनगर महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक पार पडली. त्यामध्ये हा पुतळा आहे त्या स्थितीत मागे घेऊन ५ गुंठे जागेत त्याची उभारणी करण्याचे महापौरांनी घोषित केले तर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सुशोभिकरण करण्यास मान्यता दिली.
दरम्यान या निर्णयामुळे दुर्लक्षित असलेला हा पुतळा मोरवाडी चौकाच्या क्रेंद्रस्थानी आल्याने धनगर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुमारे २० हजार धनगर समाजबांधवांची कुटुंबे वास्तव करतात. आगामी काळात अहिल्यादेवींचा पुतळा सुशोभित झाल्यास महामार्गावरील निगडी ते दापोडी या पट्टयातील भक्ती शक्ती शिल्पसमूह, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांच्या पंक्तीत अहिल्यादेवी होळकरांचा पुतळाही शहराच्या नकाशावर अग्रभागी येणार आहे. या बैठकीला धनगर महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे, आशा शेंडगे, धनंजय ताजले, बबनराव मदने, नामदेव सोनवलकर, बजरंग गडदे, आशाताई काळे, जितेंद्र मदने, लक्ष्मण टकले, माणिकराव बारगळ, महादेव कवितके, सोनाताई गडदे, बाळासाहेब वाघमोडे, अजय दुधभाते, रूक्मिणी धर्मे, विणा सोनवलकर, बंडू मारकड, विठ्ठल सरेकर राजेंद्र गाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.