‘हा छंद जिवाला लावी पिसे’ असे म्हटले जाते. कोणाला कशाचा छंद जडेल काही सांगता येत नाही. थेरगाव येथील संभाजी बारणे या भाजप कार्यकर्त्याने आपल्या अनोख्या छंदातून जमा केलेला एक संग्रह नुकताच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडे नोंदणीस पाठवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हा संग्रह आहे व्हिजिटिंग कार्ड गोळा करण्याचा आणि ते पण नगरसेवकांचे! वाचून आश्चर्य वाटेल पण या छंदाने त्यांना आनंद, दु:ख बेफिकीरी, वैताग, चिडचिड असे सारे अनुभव तर दिलेच शिवाय ६ वर्षे कराव्या लागणार्या या छंदाने त्यांच्या खिशाला ५ लाख रूपयांपर्यंतची चाटही दिली आहे. त्यांच्या संग्रहात १९७० ते २०१७ पर्यंतच्या १२०० नगरसेवकांचे व्हिजिटिंग कार्ड जमा आहे.
१९७० साली पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन झाली. तेव्हाचे नगरसेवक कोण होते? ते शोधून काढण्यापासून त्यांचे कार्ड, लेटर किंवा कसलाही कागदाचा कपटा किंवा सहीची नोंद मिळते काय? हे शोधण्यासाठी त्यांना घालाव्या लागलेल्या खेटा फारच मजेशीर अनुभवांच्या आहेत.
श्री. बारणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत अवघ्या ३१९ मतांनी भाजपचे तिकीट असूनही पराभूत झाले. एक डॅशिंग लढवय्या कार्यकर्ता अशी त्यांची इमेज आहे. हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागलेला होता. त्यांची धडपड, निष्ठा पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांना महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर तसेच शासनाच्या दक्षता समिती व महापालिकेच्या मराठी भाषा कमिटीवर घेऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.
यासंदर्भात ‘बातमी खास’ शी बोलताना बारणे म्हणाले की, या छंदाने मला खुप काही शिकविले आहे. नगरसेवकांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र, पदके, सर्टिफिकिट सांभाळून ठेवण्याचे अजिबात महत्त्व वाटत नाही. दस्त म्हणूनही कोणी त्याकडे पहात नाही. १९७० पासूनचे नगरसेवक शोधणे, त्यांची घरे शोधणे, त्यांची कपाटे, फाईली धुंडाळणे इतपर्यंत आपणास मेहनत घ्यावी लागली. माझा हा छंद पाहून व ऐकून या बोअर कामासाठी कोणी बरोबर पण येत नव्हते. मग दारू पार्टीचे साकडे घालून मित्र मंडळींना राजी करून हा छंद पूर्ण केला व तो आता लिम्का बुक रेकॉर्डकडे पाठविला असल्याचे त्यांनी म्हटले.