शाळेची गॅदरींग असो की, १५ ऑगस्ट की २६ जानेवारी अशा वेळी कौतुकभरल्या नजरेने आपल्या मुलांचे गुण पाहताना तसेच ते परेड करताना, राष्ट्रगीत गाताना प्रत्येक पालकाची छाती अभिमानाने फुगत असते. त्यातच मुलाने काही जिंकून आणले तर पोरांपेक्षा आईबापच जास्त खूश असतात.
पण जर पालकांनाच स्पर्धेत भाग घेऊन पदके मिळविण्याची संधी दिली तर…? या कल्पनेने पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कुलने खास पालकांसाठी ५ जानेवारीला झालेल्या क्रीडा स्पर्धा सप्ताहामध्ये एक अनोखी स्पर्धा घेतली. खुद्द शाळेनेच लहान बनण्याची संधी दिल्याने आपल्या मुलांना ‘बाप आखीर बाप होता है… आणि ‘माँ को कम न समझो, माँ, माँ होती है’ हे पोरंना पालकांनी दाखवून दिलं.
निमित्त होतं, धावण्याच्या स्पर्धेचे… महिला पालकांसाठी डोळे बांधून धावायचे आणि पुरुष पालकांसाठी ४५० मीटर धावणे अशी स्पर्धा होती. या स्पर्धेतील आठ विजेत्यांचा पारितोषिक देऊन काल प्रजासत्ताक दिनानिमित्त पाल्यांसमोरच सत्कार करण्यात आला. आणि विद्यार्थ्यांनीही पालक जिंकल्याबद्दल जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून वातावरण दुमदूमून सोडलं. ब्लाईड रेस या स्पर्धेत अंजली पापलवर यांनी प्रथम क्रमांक तर सीमा सपकाळ (द्वितीय) रोमा रॉय (तृतीय) भावना गुजराथी (उत्तेजनार्थ) तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये निलेश तरळेकर (प्रथम), अतुल नखाते (द्वितीय) प्रशांत राऊत (तृतीत) या पालकांनी पारितोषिके पटकाविली.
शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, प्राचार्या दिपाली जुगूळकर यांनी या स्पर्धेचे संयोजन केले होते.