उद्याच्या गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे राहणा-या एका शिक्षक दांपत्याने आपल्या घराच्या दारात प्रतिकात्मक गुढी उभारून सामाजिक संदेश दिला आहे.
सध्या कोरोनाच्या संकटाने जमावबंदी, संचारबंदी असे वातावरण आहे. त्यातच हा सण आला असल्याने आता हा साजरा कसा करायचा? या अस्वस्थ मराठी मनाला त्यांनी आपल्या कृतीतून चोख उत्तर दिले आहे. धनश्री चौगुले व श्रीकांत चौगुले असे या दांपत्याचे नाव असून दोघेही पिंपरी महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत.रांगोळी, छोटासा लाकडी काठीचा तुकडा, तांब्या,कापड वापरून ही गुढी त्यांनी दारातील उंब-याजवळ उभारली आहे. गाठी हा प्रकार अवघ्या शंभर वर्षापूर्वी आला असून ती असली काय किंवा नसली तरी फरक पडत नसल्याचे त्यांनी बातमी खासशी बोलताना सांगितले.
दरम्यान याविषयी त्यांनी नागरिकांच्या माहितीसाठी केलेले विवेचन आम्ही देत आहोत.
गुढी उभारू विजयाची, कोरोनाच्या उपायांची
———————
हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा असलेला गुढीपाडवा हा सण उदया(बुधवारी) असून संपूर्ण देशाला कोरोनाच्या संकटाने वेठीस धरायला लावलेल्या या विषाणूजन्य साथीचा पराभव करणे म्हणजेच विजयाची गुढी उभारणे आहे.
गुढी उभारणे म्हणजेच आनंद साजरा करणे, विजयाचे गुणगान करणे असा असला तरी सध्या आपला देश एका मोठया संकटातून जात असून त्यावर मात करणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे.सरकारने सुचविलेल्या उपायांचे पालन करणे याचाच अर्थ विजयाची गुढी उभारणे होय.
गुढी म्हणजे ध्वज( पताका) हे विजयाचे निशान..! जुलूमी शकांवर शालिवाहन राजाने फिरविलेल्या विजयाचे, आनंदाचे प्रतिक ..! शेकडो वर्षापासून आपण हा विजयोत्सव साजरा करतो.आता मात्र कोरोनारूपी शत्रुचे आपल्यावर आक्रमण होते आहे.ते परतून लावण्यासाठी त्यावर विजय मिळविण्यासाठी गरज आहे ती फक्त उपायांची..!
भारतीय माणूस मुळातच उत्सवप्रिय ,त्याला एकत्र यायला आनंदोत्सव साजरा करायला आवडते.म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण, उत्सवांची रचना आहे.पण ही उत्सवप्रियता कधीकधी धोकादायकही ठरू शकते.सध्याचे वातावरण हे जमावबंदीचे, एकमेकांशी प्रत्यक्षातला संपर्क टाळण्याचे आहे.त्यासाठी घरातच राहणं आवश्यक आहे.पण उदयाच्या गुढी पाडव्यासाठी काठीपासून गाठीपर्यंतच्या सामानासाठी घराबाहेर पडणे आणि गर्दी टाळणे आवश्यक आहे.तसंही सगळंच बंद अाहे आणि कुठं मिळतं का बघू यासाठी बाहेर पडणं है गैरच..! मूळात गुढी म्हणजे विजयध्वज , पूर्वीपासून हा लोकांनी कसा उभारला तर मिळेल त्या साधनांनी,घरात असेल त्या वस्तूंनी..! म्हणून तर गुढीला साडीपासून कपडयाच्या तुकडयापर्यंत काहीही चालतं,तर मग आता सुध्दा घरात उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून गुढी उभारू या..! एका अर्थाने प्रतिकात्मक सण साजरा करू या, त्यासाठी रांगोळीने गुढीचे चित्र काढून सण साजरा करता येईल.
कागदावर चित्रही रेखाटता येईल, शेवटी काय? सण साजरा करायचाय तर तो असाही आनंदाने करणे शक्य आहे.आनंद व्यक्त होणे महत्त्वाचे ..!
आपला समाज किती उत्सवप्रिय आहे हे परवा २२ तारखेला दिसून आले. पंतप्रधान मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थाळी किंवा टाळी वाजवावयास सांगितली परंतू लोकांनी त्याचे सेलिब्रेशन केले.मिरवणूका काढल्या, फटाके फोडले हे सर्व टाळले पाहिजे.त्यासाठी हा गुढीपाडवा साधेपणाने घरी साजरा करू या, बाहेर पडणे टाळू या, कोरोनाशी लढण्यासाठी साधेपणाने जे जे शक्य आहे ते सारे करू या
शेवटी एकदा या करोनारूपी राक्षसाचा नायनाट केल्यानंतरच विजयोत्सव साजरा करू या, तो दिवस व ती तारीख म्हणजे गुढीपाडव्याचा तो सण असेल.