(विजय जगताप)
जनतेने स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पुकारावा या आवाहनाला आज सर्वच थरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. पाच वाजता टाळ्या वाजवाव्यात या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला सर्वसामन्य नागरिकांपासून बॉलिवूडची स्टार मंडळी व नेतेही सहभागी असल्याचे चित्र दिसले .
आज (रविवारी) सकाळी सात वाजल्यापासून कोणीही बाहेर पडू नये व कोरोनाशी लढणाऱ्या लढाईमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केले होते. त्यामुळे सलग दहा तास घरात ठाण मांडून बसलेल्या नागरिकांनी पाच वाजत नाही तोच टाळ्या वाजवण्यास सुरूवात केली. त्यास कारणीभूत ठरल्या झी समूहाच्या सर्व चॅनेलवरून दिल्या गेलेल्या क्लॅपिंग विषयीच्या जाहिराती..!
लोकांनी आपापल्या गॅलरी, गच्ची, टेरेस,माडी, अंगण, ओसरी येथे एकत्र येत टाळ्या वाजवणे सुरू केले. ज्यांच्यांकडे यापैकी काहीही नाही त्यांनी थेट रस्ता गाठून दहा तास कोंडलेली वाफ यानिमित्ताने मोकळी केली. टाळ्यांबरोबर थाळ्या वाजविणे, गणेश आरती, भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनीही आपापला परिसर दणाणून सोडला.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या परिवारासह जलसा बंगल्याच्या टेरेसवरून टाळ्या वाजविल्या, ऐश्वर्या बच्चनने तर देवघरातील घंटी वाजविली. दिपिका पदुकोनने आपल्या नवऱ्याबरोबर (रणवीर सिंग) टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. शिल्पा शेट्टी तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या राहत्या घरी टाळ्या वाजवून सहभाग घेतला.