विजय जगताप
राज्याच्या नजरेत पुण्याजवळचे एक शहर अशी कालपर्यंत ओळख असलेले पिंपरी चिंचवड आज महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण येथे असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मुखावर आले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये १० जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अधिकृत आकडेवारी असून महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हे सर्व पॉझिटिव्ह रूग्ण परदेशातून प्रवास करून आलेले तसेच त्यांच्याशी संपर्क झालेले आहेत. सामान्य नागरिकांपर्यंत अदयाप या विषाणूंचा शिरकाव झालेला नाही ही समाधानाची बाब आहे. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेची प्रशासन यंत्रणा, वैदयकीय पथक, नव्याने स्थापन केलेली तुकडी पथक तसेच शहरातील आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांचे यावर असलेले लक्ष ही उल्लेखनीय बाब आहे.
दरम्यान, सुमारे २५ लाख इतकी लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांचे नातेवाईक, मित्र मंडळी, हितचिंतक राज्याच्या कानाकोपऱ्यात असून ‘काळजी घ्या’ असे सांगणारे व चौकशी करणारे फोन रात्रंदिवस सुरू असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: पिंपरी चिंचवडमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी आज बातमी खासशी बोलताना दिली. तर शहरातील ज्येष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी राज्यातील प्रशासन व विविध पक्षांचे आमदार संपर्क ठेऊन माहिती घेत असल्याचे चित्र आहे. जीवनावश्यक बाबी सोडल्या तर ठप्प झालेल्या जनमाणसाच्या दैनंदिन कार्यशैलीमध्ये टिव्ही हेच एकमेव टाईमपास व मनोरंजनाचे साधन दिसत असल्याचे जिकडे तिकडे जाणवत आहे.