जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पिंपळे सौदागर येथील तुलिका आर्ट गॅलरीमध्ये आयोजित केलेल्या नारी एक संघर्ष या महिलाविषयक चित्रप्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
समानता व स्वातंत्र्य या दोन विषयांना वाहिलेल्या या चित्र प्रदर्शनामध्ये ४६ पेंटींग असून स्त्रीच्या विविध भावविश्वाचे व रूपाचे स्वरूप या प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहे.
रविवार ८ मार्च रोजी या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते व प्रसिद्ध महिला मूर्तीकार सुप्रिया शिंदे, लेखक विजय जगताप यांच्या उपस्थित पार पडले.
देशभरातील भाग घेतलेले कलाकार सविता कुम्बर, गीतांजलि वर्मा, मीना जोहरी, प्रमिला नित्तुर, राजेश्री एन, शोभा कुम्बर, बेबी बिरादर, रचना बजाज, प्रणिता मुठा, विधा सूर्यवंशी, स्वेता श्रीवास्तव, नेहा खस्त्रीय, भारती चौहान, प्रान्जाल गुंजिकर, डॉ. अजेय पाठक, शरण गुरव (आर्मी), भानूदान काकडे (आर्मी), केशव इंदुरिकर, चेतन काकडे, सतिश वर्तक, बसवराज कलगुडम, जयनीत सोनकर, आनन्द होरनदिकर इत्यादी कलाकारांनी आपली चित्रे या प्रदर्शनात मांडली असून पेन, पेन्सिल, चारकोल, वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर, आयल कलर आदींचा उपयोग करून नारी च्या जन्मापासून ते जागरूकता पर्यंतचे दृश्य आपल्या भावनेतून या पेंटींग मध्ये व्यक्त केले आहे.
हे प्रदर्शन १५ मार्च रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असून प्रसिद्ध युवा चित्रकार अतुल जोंधळे हे अवघ्या दहा मिनिटात चित्रे काढून प्रात्यक्षिक सादर करीत आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन डॉ. वर्षा सतिश सोनकर यांनी केले आहे.