जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना वायरसच्या धसक्याने लोकांनी चिकन खाण्याला आता विश्रांती दिली असून काल वशाटाचा वार असलेल्या रविवार देखील थंडावला.
कोरोना व्हायरस चिकनमधून फैलावतो अशा पोस्ट व व्हिडीओ सोशल मिडियामध्ये व्हायरल झाल्या आणि मागील पंधरा दिवसापासून चिकन खाण्याला उतरती कळा लागली आहे.
एकटया पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात अमीर चिकन उद्योगाकडून ५ लाख किलो चिकनची फक्त रविवारी विक्री होते. मागील रविवारी (१ मार्च) ८० हजार किलो चिकनची विक्री तर काल (रविवार) ४० हजार किलो चिकन देखील दिवसभरात संपले नसल्याची धक्कादायक बाब अमीर चिकनचे राजेंद्र लगड यांनी बातमी खासशी बोलताना नमूद केली.
अमीर चिकन समूहाने ९९ रू. किलो इतक्या खाली चिकनचा दर आणूनही ग्राहक नसल्याचे चित्र होते. ज्यांच्या खासगी पोल्ट्री आहेत त्यांनी तर ५० रूपये किलो इतका दर ठेऊनही ग्राहक फिरकत नसल्याने शिल्लक लाखो कोंबडयाचे करायचे काय? असा प्रश्न या उद्योगापुढे निर्माण झाला आहे. दरम्यान धुळीवंदना नंतर पुन्हा चिकनला चांगले दिवस येतील अशी शक्यता श्री. लगड यांनी व्यक्त केली.