पुणे महानगरपालिकेच्या वतीने लोकनाटय व लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा ‘लोकशाहीर पठ्ठे बापुराव पुरस्कार’ पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेले शाहीर अंबादास तावरे यांना जाहीर झाला आहे. येत्या ९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता घोले रोड येथील पंडीत नेहरू सभागृहात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक व लोककलावंताचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ व आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी गावठाण येथे २६ वर्षापासून राहत असलेले शाहीर अंबादास तावरे हे पठ्ठे बापुरावानंतर शाहिरी परंपरेतील ‘पितामह’ म्हणून ओळखले जातात. १९६४ मध्ये भारत सरकारच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व त्यांनी शाहिरी कला पथकाद्वारे केले होते. महाराष्ट्र शाहीर परिषद या राज्यव्यापी संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत. केंद्र व राज्य सरकारचे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध चॅनेलवरील मालिका तसेच शाहीरी पोवाडे, लोककलेचे कार्यक्रम यासाठी महाराष्ट्रात त्यांच्याइतके अनुभवी व्यक्तिमत्व नाही. शाहिरीचे लोकरंग व मराठवाडयाची शाहिरी हे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.