(विजय जगताप)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तारूढ पक्षनेतेपदी निवड झालेले नामदेव ढाके यांची महापौर होण्याची संधी हुकली होती मात्र पक्षाने निष्ठावंत गटाला न्याय देण्याची घेतलेली भूमिका व सत्तेचा समतोल तराजू राखण्यासाठी केलेले न्यायशीर वाटप खऱ्या अर्थाने पूर्ण आता झाले आहे.
१९९७ पासून भाजपमध्ये सक्रीयपणे काम करत असलेले नामदेव ढाके हे वास्तविक कामगार नेते…! टाटा मोटर्स एम्पलॉईज युनियनमध्ये १७ वर्ष त्यांनी कामगारांचे नेतृत्व केले. मूळचे खानदेश (जळगाव) मधील असलेले ढाके हे तत्कालीन टेल्को असे नाव असलेल्या कंपनीत कामगार म्हणून रूजू झाले आणि शहरात स्थायिक झाले. पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे अडीच लाख लोकसंख्या असलेल्या खानदेशातील रहिवाश्यांचे नेतृत्व करण्यास त्यांनी सर्वप्रथम सुरूवात केली. भाजपमध्ये काम करू लागल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजप कामगार आघाडीच्या सरचिटणीस पदाचीही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००४, २०१२ व २०१७ अशा तीन महापालिका निवडणूका त्यांनी लढविल्या. २०१७ मध्ये त्यांना यश आले. भाजपमधील एकेकाळची बुलंद तोफ व नेते असलेले एकनाथ खडसे यांच्या निकटचे म्हणून ते ओळखले जातात. २०१७ मध्ये भाजपची सत्ता महापालिकेत आल्यानंतर ओबीसीसाठी आरक्षित झालेल्या महापौरपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांना तेव्हा संधी मिळू शकली नाही.
भाजप सत्तेच्या उर्वरित दोन वर्षासाठी त्यांची सत्तारुढ पक्षेनेतेपदी आता निवड होऊन पक्षाने त्यांना न्याय दिल्याचे बोलले जात आहे. नगरसेवकांची मोट बांधून महापालिका प्रशासनाबरोबर सुसंवाद राखत गाडा हाकण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे.