सलग दोन वर्षे शालेय कबड्डी स्पर्धेचे राज्य अजिंक्यपद पटकाविणाऱ्या महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक शाळेच्या कबड्डी संघाला विमानाने दिल्ली दर्शन व संसद पहायला लवकरच मिळणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विदयालयाच्या कबड्डी संघातील मनिषा राठोड, भुमिका गोरे, तेजल महाजन, रूपाली डोंगरे, निकिता माळी, चाँदणी गायकवाड, विदया गायकवाड, सविता गवई, सिफा वस्ताद, निकिता माळी, सखु जाधव, कोमल राठोड या बारा मुलींनी पिंपरी चिंचवड शहराचे नाव राज्यात चमकविले आहे. नुकतेच या मुलींनी सलग दुसऱ्यांदा राज्य शालेय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकाविले. त्याबद्दल मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या सर्व विजेत्या खेळाडूंचा काल सत्कार करण्यात आला. या मुलींनी व त्यांच्या शिक्षकांनी थेरगावचे नाव राज्यभर पोहोचविल्याचे बक्षीस म्हणून आपण स्वखर्चाने या सर्वांना वार्षिक परिक्षा झाल्यानंतर दिल्लीला फिरायला नेणार असल्याचा शब्द खासदारांनी यावेळी दिला.
याप्रसंगी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे, नगरसेवक अभिषेक बारणे, मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, क्रिडा शिक्षक व या मुलींना घडविणारे बन्सी आटवे यावेळी उपस्थित होते.