(विजय जगताप)
नगरसेवक या शब्दाला जागणारा व आपण आपल्या प्रभागातील जनतेच्या सेवेसाठीच आहोत याची प्रचिती आपल्या वर्तनातून दाखवून देणारा एकमेव म्हणता येईल असा नगरसेवक पिंपरी चिंचवड शहरात असल्याची धक्कादायक बातमी नुकतीच ‘बातमी खास’ला समजली.
हे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असून २०१७ मध्ये प्रथमच ते पालिकेवर निवडून आले आहेत. दानशूर कर्णाप्रमाणे खिसा ढिल्ला करत प्रभागातील प्रत्येकाच्या अडी अडचणीला व सुखदु:खाला धावून जाताना अजिबात माझे नाव कुठे टाकू नका, बॅनरवर फोटो झळकवू नका, आणि माझ्यामुळे कोणाचे काही चांगले झाले तर माझा सत्कारही करू नका असे निक्षून सांगणारे हे नगरसेवक आहेत.
बातमी खासच्या पत्रकाराने जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा तर किंचितही शहारून न जाता उलट ‘अभिमान, प्रौढी, गर्व करण्यासारखे मी काहीच करत नाही. कशाला माझ्या या कामाला प्रसिद्धी देता?’ असे म्हटल्याने पत्रकारावरच चक्कर यायची पाळी आली. विशेष म्हणजे हे नगरसेवक गाववाले (स्थानिक) आहेत. छटाकभर काम केले तरी फेसबुकवर, व्हॉटसअपवर, प्रभागातील नागरिकांच्या ग्रुपवर पोवाडे गाणारे नगरसेवक व कार्यकर्ते शहरात आहेत. साधं रक्तदान केलं, झाड लावलं तरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली दवंडी पिटवणारे राजकीय महाभागही या शहरात आहेत.
नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील महापालिका शाळेचा ध्वजारोहण कार्यक्रम, प्रभातफेरी ही मनोवेधक असावी यासाठी अडीच ते तीन लाख रूपये खर्च केले. विशेष म्हणजे पुढच्या २६ जानेवारीला जे शिक्षक वा कर्मचारी या शाळेत नसतील म्हणजेच निवृत्त होतील अशांकडूनच त्यांनी ध्वजारोहण करून घेतले. शाळेतील आख्ख्या ३ हजार पोरा-पोरींना या दिवशी नाश्ता दिला. तर जवळपास १२५ शिक्षकांना प्रजासत्ताक दिनाला तुम्ही शाळेत आलात म्हणून सुपर क्लास नाश्ता देऊन आश्चर्याचा धक्का दिला. या अजब प्रकारामुळे तर मास्तरमंडळींना हसावे की रडावे हा प्रश्न पडला होता.
अनुदानित तुकडयांनाच शासनाचा माध्यान्ह पोषण आहार मिळतो मग उर्वरित पोरांचे काय? या काळजी पोटी स्वखर्चाने राहिलेल्या सर्व पोरांनाही रोज जेवण देण्याची व्यवस्था गेल्या १ वर्षा पासून करीत आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांवर व शाळेतील मुलांप्रती अपार करूणा, प्रेम शब्दातूनच नाही तर कृतीतूनही दाखविणारे हे नगरसेवक आगळे वेगळे म्हणावे लागतील. बातमी खास तर्फे त्यांना शुभेच्छा व धन्यवाद…!
(आमची इच्छा असूनही त्यांचे नाव व प्रभाग आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही.)