पिंपरी – अखंड विश्वाचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते मंत्रालय, मुंबईपर्यंत पायी चालत अर्धनग्न महामोर्चा रविवार दि. २२.११.२०२० रोजी आयोजित केला होता.
जानेवारी २०२० मध्ये श्री. श्री. रवीशंकर यांच्याकडून यु-ट्युबवर त्यांच्या अधिकृत पेजवर प्रसारित केलेला व्हीडिओ, कॅलेंडर तसेच विविध लेखांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची खोटा इतिहास मांडून बदनामी केल्याचे पिंपरी-चिंचवडमधील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून विविध निवेदने, आंदोलने करूनसुद्धा पोलीस प्रशासनाने श्री. श्री. रवीशंकर व इतर दोषींवर गुन्हा दाखल केला नाही. यामुळे शिवप्रेमी व संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न महामोर्चाचे आयोजन केले होते. याची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने सतिश काळे यांना लवकरात लवकर गुन्हा दाखल करू असे लेखी आश्वासन दिले. यामुळे संभाजी ब्रिगेडने सदरचा अर्धनग्न महामोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे.