निवडणूकीचा फाॅर्म भरण्यासाठी आख्खं ठाकरे कुटूंब आल्याची छायाचित्रे सर्वत्र प्रसिध्द झाल्याने आज दिवसभर सोशल मिडियात टोमण्यांची बरसात महाविकास आघाडीवर कोसळली.
विधान परिषदेतून आमदारकीचा मार्ग मोकळा होत निश्चिंत झालेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुस्कारा सोडला असला तरी ‘आता एकवीरा देवीचे दर्शनही एकत्र होऊन जाऊ दया’ तसेच ‘हे काय भलतंच’असे टोमणे सोशल मिडियात मारले जाऊ लागले. विधिमंडळात आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदार होण्यासाठी विधान परिषद निवडणूकीचा फाॅर्म जमा केला. नऊ जागांसाठी नऊच जणांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे . ठाकरे यांच्याबरोबर पत्नी रश्मी, मुलगा तेजस तसेच मंत्री असलेले थोरले सुपुत्र आदित्य ठाकरे उपस्थित होते.
२७ मे पूर्वी कुठल्याही स्थितीत आमदार होणे ठाकरे यांना आवश्यक होते. राज्यपाल कोटयातून आमदार होण्याच्या मार्गात आलेले अडथळे तसेच भाजपच्या एका कार्यकर्त्यांने उच्च न्यायालयात दावा दाखल करून निर्माण केलेली आडकाठी यामुळे शिवसेना मधल्या काळात प्रचंड अस्वस्थ होती.
ठाकरे यांच्या डोक्यावरील टांगती तलवार आता दूर झाली असली तरी फाॅर्म भरण्यासाठी कुटूंबाने लावलेल्या हजेरीवर सोशल मिडियात विरोधी पक्षाकडून शाब्दिक टोमणे मारण्यात येत आहेत. उध्दव ठाकरे प्रथमच आमदार झाल्याने कुटुंबाला आनंद होणे स्वाभाविक असल्याचे उत्तर सेनेच्या गोटातून त्यांना देण्यात येत आहे.