( विजय जगताप)
आज सचिनचा वाढदिवस..! आज ‘बातमी खास ‘तुम्हाला सचिनच्या अत्यंत खासगी , तसेच सार्वजनिक अशा काही गोष्टी सांगणार आहे.२००० नंतर ज्यांचा जन्म झाला आहे ते ही बातमी वाचताना तर अक्षरश: शाॅक होतील.
सचिन रमेश तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटमधील असं नाव की त्याच्याशिवाय क्रिकेट आणि क्रिकेटशिवाय तो वेगळं होणंच अशक्य आहे . या खेळातला देव,भगवान, सुपरस्टार अशा नावाने त्याला ओळखलं जाते. साहित्यिक रमेश तेंडुलकर यांचा पोरगा असलेला सचिन हा अस्सल मराठी अर्थातच महाराष्ट्रीयन..!
वयाच्या १५ व्या वर्षी मुंबई क्रिकेट संघात आणि १६ व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघात दाखल झालेला जगातील एकमेव नशीबवान व कर्तृत्ववान पोरगा की ज्याने वयाच्या १७ व्या वर्षी सचिन तेंडुलकरचे वडील अशी ओळख आपल्या वडिलांसाठी निर्माण केली.
यश, पैसा, लोकप्रियता,मान- सन्मान व नखाएवढा ओरखडा पण येऊ दिला नाही अशी आजपर्यंत राखलेली इज्जत आज एक दंतकथा बनली आहे. आज ४८ वर्षी पदार्पण करत असलेला सचिन म्हणूनच सर्वांना अरे तुरेतला वाटतो.
सचिन हे नाव त्याला त्या काळातला लोकप्रिय बालकलाकार असलेल्या सचिन पिळगावकर वरून त्याच्या आई वडिलांनी ठेवले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल,१९९० नंतर १९९५ पर्यंत भारतात विशेषत: महाराष्ट्रात जेवढी पोरं जन्मली त्यातील ५० टक्के आईबापांनी आपल्या पोरांचं नाव सचिन ठेवलं हा इतिहास आहे.
अतिशय शांत, अबोल,संयमी असलेला सचिन आनंदात कधी बेहोश झाला नाही की दु:खात कधी कोसळला नाही. मनाची एकाग्रता व संतुलन राखावे ते सचिननेच..!
त्याच्या वयाहून पाच वर्षानी मोठया असलेल्या डाॅ अंजली हिच्या तो प्रेमात पडला.पाच वर्ष त्याचंही अफेअर चाललं व तिच्याशीच लग्न केलं. जगातली सगळी सुखं पायाशी असतानाही व यशाची धुंद असतानाही तो इम्रान हाश्मी बनला नाही. विवेक, स्त्रीसन्मान हा त्याच्या जणू रक्ताच भिनला आहे.यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्याने केलेल्या टिव्ही अॅड जगातल्या कुठल्याच क्रिकेटरनेच काय अमिताभने देखील आजपर्यंत केलेल्या नाहीत.(३६३)
मला आठवतंय, त्याची पहिली अॅड ह्युंदाई कंपनीची सॅन्टरो कारची होती देशातील हजारो लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन ही कार घेतली .’हात लावीन ते सोनं ‘अशी जादू लाभलेल्या या स्टारवर जगातल्या सुंद-या व भारतीय सिने इंडस्टरीतील हिराॅईन व त्यांचे बाप तर पदर पसरून असायचे.पण या पट्ठयाने स्वत:चा पाय कधी घसरू दिला नाही. मॅच जिंकली, वल्ड कप हाणला तर त्याचे सहकारी शॅम्पेन उडवून ढग जमा करायचे पण हा बाबा फक्त हसून आनंद साजरा करायचा.
१९९९ मध्ये पुण्यातील नेहरू स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजबरोबर असलेल्या सामन्यासाठी तो आला असता आदल्या दिवशी सकाळी अकराची पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याला डोळे भरून पाहण्यासाठी मी ८ वाजताच ब्लू डायमंड या हाॅटेलवर गेलो होतो.
सारं जग ज्यांच्या नावाने अक्षरश: वेडं आहे ते अमिताभ, लता मंगेशकर,राहुल गांधी त्याच्यासाठी वेडे होते.त्याला खासदार नेमतानाचे वेळी (२०१२)पंतप्रधान व राष्ट्रपती त्याला शपथ देताना त्याच्याकडे पाहून धन्य होत होते. दुनिया मेरी मुठ्ठी मे वाल्या रिलायन्सने आयपीएलच्या मुंबई इंडियन्समध्ये सचिनसाठी लावलेली बोली व सचिन मिळाल्यानंतर निता व मुकेश अंबानी यांना झालेला आनंद तर गगनात मावत नव्हता. आपल्याकडे असलेल्या अब्जावधी रूपयांपेक्षा सचिन आमच्या संघात हे सांगणं “जगात सगळयात भारी” अशी त्यांची भावना होती.
सा-या दुनियेला वेड लावणारा सचिन मात्र सप्टेंबर २०१८ नंतर बुध्दांच्या प्रेमात पडला. जगाला मानवता ,करूणा, शांती , विपश्यना व ध्यानाची ताकद देणारे बुध्द हे भूतानला जाऊन आल्यानंतर सचिनला उमगले.