विजय जगताप
पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कुलच्या पहिल्याच दहावीच्या बॅचच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ नववीतील विदयार्थ्यांनी पुढाकार घेऊन साजरा करून संघभावनेचे अनोखे दर्शन नुकतेच घडविले.
दहा वर्षापूर्वी पिंपळे सौदागर या भागात सामान्य शेतकरी कुटुंबातील जगन्नाथ काटे यांनी पी. के. इंटरनॅशनल स्कुलची स्थापना केली. दहावीची पहिलीच बॅच आता या शाळेतून बाहेर पडणार असल्याने श्री. काटे, मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, वर्गशिक्षिका संगिता पराळे यांनी आपल्या पहिल्याच दहावीच्या बॅचचा निरोप समारंभ अनोख्या व हटके पद्धतीने साजरा केला. यासाठी शाळा व्यवस्थापनाने नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विदयार्थ्यांसाठी स्नेहभोजन ठेवले. तसेच दहावीच्या मुला मुलींसाठी फॅशन शो, रॅम्प वॉक, व्यक्मित्व विकास चाचणी आदी स्पर्धा घेतल्या.
हल्लीची तरूण पिढी कशा पद्धतीने विचार करते. देशाविषयी त्यांच्या काय भावना आहेत? याची प्रचिती प्रश्नोत्तराच्या निमित्ताने यावेळी सर्वांना आली. आयुष वाघमारे (प्रथम) भैरव चौधरी (द्वितीय) व मणजीत निर्मलकार (तृतीय) या विदयार्थ्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली.
प्रश्नोत्तराच्या हजरजबाबीपणावर मिस्टर पी. के. इंटरनॅशनल आणि मिस पी. के. असे दोन विजेते यावेळी निवडण्यात आले. त्यामध्ये आयुष वाघमारे याने मिस्टर पी. के. इंटरनॅशनल तर गायत्री राजूरकर या मुलीने मिस पी. के. इंटरनॅशनल हा किताब मिळविला.
करियर म्हणून कोणती वाट निवडशील? या प्रश्नावर क्षणाचाही विचार न करता आयुषने मला देशसेवेसाठी आर्मीत जायचे आहे अशी भावना व्यक्त केली. तर बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यापैकी तू कशाची निवड करशील? या प्रश्नावर गायत्रीने, बुद्धिमत्ता प्राप्त झाली किंवा यश मिळविले तर सौंदर्य विकत घेता येऊ शकते असे करारी उत्तर दिले.
गाणी, डान्स, विनोद, एकमेकांच्या नकला आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमही यावेळी पार पडले. विशेष म्हणजे या निरोपसमारंभाच्या आयोजनासाठी नववीतील विदयार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला. शाळेनेही त्यासाठी मुलांना स्वातंत्र्य दिले होते. सर्व मुलांनी शाळेप्रती कृत्रज्ञता व मनोगत व्यक्त करून आपल्या भावनांना वाट करून दिली. शाळेसाठी प्रत्येकाने गिफ्ट आणले होते. तर पी. के. स्कुलनेही प्रत्येक विदयार्थ्यांना फोल्डर फाईल भेट दिली. शाळेचे क्रीडा शिक्षक राहुल कोरे यांच्या प्रती सर्व विदयार्थ्यांनी भावनावश होऊन त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.