——-
( विजय जगताप)
लबाडी व फसवणुक करण्यासाठी थेट महापालिका आयुक्तांचा वापर करण्याची घटना पाच वर्षात दोनदा पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे.
पिंपरी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा फोटो व्हाॅटसअप डिपीवर ठेऊन पैसे मागण्याची घटना काल उघडकीस आल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि रितसर तक्रार सायबर सेलकडे करण्यात आली. भ्रष्टाचा-यांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा असलेल्या आयुक्त राजेश पाटील यांनाच बदनाम करण्याचा फंडा आरोपीकडून वापरण्यात आल्याने हे प्रकरण वाटते तितके डोळयाआड करणारे नक्कीच नाही. सध्या अनेकांच्या “कपाळात”आयुक्त पाटील बसले आहेत.त्यामुळे ऐनकेन प्रकारे बदनाम करण्याचे उद्योग व कट शिजणे स्वाभाविक आहे.
बरोबर पाच वर्षांपूर्वी दिनेश वाघमारे हे पिंपरी महापालिका आयुक्त असताना शिर्के नावाच्या त्यांच्या तत्कालीन पीएने एका बांधकाम व्यावसायीकाकडे ( बिल्डर) ४ लाखाची लाच मागितली होती. त्या बिल्डरने लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल केल्याने पालिकेची, आयुक्तपदाची व शहराची पुरती शोभा झाली होती. ‘आयुक्तांना पैसे दयावे लागतात’ असे बिवदिक्कतपणे या शिर्के महाशयांनी म्हटले होते. तेव्हा हे प्रकरण चांगलेच गाजले होते.
आता त्याची पुन्हा पुनरावृ्त्ती झाल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.