———
(विजय जगताप)
कुठलाही गाजावाजा न करता अचानक ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो सफर घडवल्याने भाजपच्या रडारवर आता मेट्रो प्रशासन आले आहे.
केंद्र शासनाची हत्तीएवढी आर्थिक ताकद या प्रकल्पात गुंतलेली असताना शेपटीभर वाटा राज्य सरकार व पुणे महापालिकेचा असल्याने भाजपला शरद पवार यांनी केलेली मेट्रो सफर फारच झोंबली आहे.
राज्य भाजपने खरमरीत प्रेस नोट काढून मेट्रो प्रशासनास धू धू धुत हक्कभंग आणण्याचा इशारा दिला तर पिंपरीच्या महापौर उषा ढोरे यांनीही मेट्रोवर आगपाखड केली आहे.
दरम्यान, १३ सप्टेंबर २०२१ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मेट्रोची फुगेवाडी ते पिंपरी ट्रायल रन भल्या पहाटे घेतली होती. तेव्हाही महापौर व शहरातील आमदारांना मेट्रो प्रशासनाने अंधारात ठेवले होते. महापालिका निवडणूकीचा तवा तेव्हा तापलेला नसल्याने भाजपने अजितदादांची मेट्रो वारी फारशी गांभीर्याने घेतली नव्हती. आता पालिका निवडणूका तोंडावर असल्याने व मेट्रोचे सारे श्रेय केंद्र सरकारचे असताना शरद पवार यांना घडविलेल्या या सफरीमुळे भाजप मंडळी अस्वस्थ झाल्याचे पहावयास मिळत आहे.
स्थानिक मंडळींच्या नाकदु-या देखील काढाव्या लागतात असे समजल्याने मेट्रोच्या जनसंपर्क विभागाची भंबेरी उडाल्याचे आज पहावयास मिळाले. याच संधीचा फायदा घेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या काफिल्यासह आज मेट्रो सफर केल्याने भाजपच्या शहरातील आमदार व महापौर यांच्या संतापाच्या आगीत बदाबदा तेल पडले आहे.