एकीकडे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रूग्णांना बेडसाठी वणवण फिरावे लागत असताना कागदोपत्री बेड भरले असल्याचे दाखविणा-या अॅटो क्लस्टरमधील कोविड सेंटरची जबाबदारी सांभाळणा-यांचे काल (रविवारी)पितळ उघडकीस पडले.
गेले दोन महिन्यांपासून ज्या स्पर्श हाॅस्पिटलच्या बिलावरून पालिकेत शिमगा पेटला आहे व अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनाही पालिका सेवेतून जावे लागले त्या स्पर्श हाॅस्पिटल व्यवस्थापनाचा ॲटो क्लस्टर कोविड सेंटरमधील बेड लपविण्याचा प्रताप भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पालिकेच्याच डाॅक्टरांच्या सहाय्याने उघडकीस आणला आहे.
श्री वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना स्पर्श व्यस्थापनाचा चूकीचा कारभार ॲटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये सुरू असल्याची कल्पना दिली होती. खात्री करण्यासाठी आयुक्तांनी पालिकेचे डाॅ विनायक पाटील यांना वाघेरे यांच्याबरोबर जाऊन वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश दिले .त्यानुसार या दोघांनीही केलेल्या पाहणीत आॅक्सिजन बेड तसेच साधे बेड मोठया संख्येने रिकामे असल्याचे त्यांना आढळून आले.
खोटी पेशंट संख्या दाखविणे, उपचारासाठी अमूक अमूक खर्च झाल्याचे दाखविणे अशी लबाडी करून पालिकेकडून बिल लाटता येते .विशेष म्हणजे या सेंटरमध्ये उपलब्ध मनुष्यबळ इतके अपुरे होते की त्यानध्ये कोविड सेंटरचे व्यवस्थापन करता येणे अशक्य होते.आता आयुक्त पाटील या प्रकरणी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.