कुठलीही शक्यता वा चर्चा नसताना अचानकपणे पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांना पक्षाने द्यायला लावलेला पदाचा राजीनामा गेले दोन दिवस शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये अचानकपणे त्यांच्या पदरात पडलेले उपमहापौरपद तितक्याच अचानकपणे काढून घेण्याची पक्षावर वेळ येणे याचा अर्थ बरंच काही सांगून जातो. वास्तविक अशा प्रकारे पदाचा राजीनामा द्यायला लावून त्यांना अपमानित करणे पक्षाला का करावेसे वाटले, हा म्हटला तर गंभीर व तितकाच आश्चर्यचकीत करणारा प्रश्न आहे.
हिंगे यांचा स्वभाव व काम करण्याची स्टाईल वास्तविक भाजपच्या व गाववाल्या नगरसेवकांच्याही चौकटीत न बसणारी गोष्ट…! स्थायी अध्यक्षपदासाठी आग्रही असलेले शितल शिंदे यांच्या तोंडाला पक्षाने पाने पुसली म्हणून चालून आलेले उपमहापौरपदही शिंदे यांनी नाकारून पक्षाशी निष्ठा तर दाखविलीच शिवाय योग्य तो संदेशही दिला.तेव्हा अचानकपणे या पदाची वरमाला हिंगे यांच्या गळयात पडली. तसे पाहिले गेले तर हे पद म्हणजे शोभेची बाहुली..! मागील ३४ वर्षात झालेले सर्व उपमहापौर आठवायचे म्हटले तरी आठवत नाही अशी स्थिती…! हिंगे यांनी मात्र या पदाला ‘प्रश्नांकीत वलय ‘मिळवून दिले.रूबाब, शान, दरारा व
वलय असलेले महापौरपदही त्यांच्या कार्य कर्तबगारीच्या झपाटयात झाकोळून टाकण्याची नकळत कृती घडली गेली. त्यांची पार्श्वभूमी व नगरसेवक होण्यापूर्वीची प्रतिमा उपमहापौरपद सांभाळताना अधिकच बाणेदार झाली.
असे म्हणतात की,पतंग असो वा माणूस जास्त हवेत उडू लागला की त्याला काटले जाते, बहुधा त्यांच्या बाबतीतही असंच घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.खरं काय, खोटं काय? हे हिंगेंना व त्यांना घालविणा-यांनाच ठाऊक….!