( विजय जगताप )
१६ ऑगस्ट पारशी नववर्ष दिन. महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या या दिवशीच तत्परता दाखवत राज्यशासनाने पिंपरी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली करण्याचा परवा निर्णय घेतला. मात्र ज्या सुपर वेगाने हालचाल करत बदलीचा निर्णय झाला त्याच्या चौपट वेगाने त्यांच्या बदलीबाबत .. ‘हे चुकीचे झालंय’.. असा सूर शहरवासियांमध्ये आता व्यक्त होत आहे.
राज्यातील आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांच्या जेव्हा जम्बो बदल्या होतात तेव्हा प्रशासनाची घडी बसवण्याच्या तयारीचा तो भाग असतो, असे संकेत असतात. परंतू अचानकपणे एखाद-दुस-या अधिका-याची जेव्हा बदली केली जाते तेव्हा त्यामध्ये शंकेला जागा असते. राजेश पाटील यांच्याबाबत नेमकं तेच घडत गेलं. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून अवघे अठरा महिने झाले असतानाच शहराच्या प्रतिमा निर्मितीसाठी सुक्ष्म नियोजन करत त्यांनी वेग धरलेला असतानाच त्यांची बदली केल्याने दस्तरखुद्द राजेश पाटील यांच्यासह सारेच आश्चर्यचकित झाले. वास्तविक त्यांच्या कार्यकाळातील अठरा महिन्यांपैकी आठ-दहा महिने कोरोना नियंत्रण करण्यातच गेली. परंतु त्याही काळात शहराची घडी बसवणं व वेसन हातात घेत तुंबलेल्या मो-या एका झटक्यात मोकळ्या कराव्यात त्याप्रमाणे ढिम्म झालेल्या व सुस्तावलेल्या प्रशासनास यांनी चावी देऊन चार्ज केलं. वास्तविक या शहराचा परिघ व आवाका समजून घेण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी नवीन अधिकाऱ्यांना सहज लागतो. राजेश पाटलांनी पहिल्या दिवसापासूनच नागरिकांप्रती उत्तरदायित्व व त्यांच्यासाठी मूलभूत कर्तव्य बजावण्याच्या पालिका धोरणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. आयएएस असला तरी प्रत्येक अधिकारी हा प्रथम माणूस असतो. त्याचा स्वभाव, आवडी-निवडी ,छंद या गोष्टींचे प्रतिबिंब साहजिकच त्याच्या कामात ठळकपणे दिसून येते.
गरिबी ,संघर्ष याचे चटके भोगलेल्या जिद्दी, स्वाभिमानी व संवेदनशील हृदयाच्या राजेश पाटील यांनी सर्वप्रथम येथे येऊन कोणती फत्ते कामगिरी केली असेल तर ती म्हणजे स्थानिक पुढाऱ्यांच्या मगरमिठीतून या शहराला अलगदपणे सोडवत येथील नागरिक हाच आपला केंद्रबिंदू त्यांनी बनवून टाकला. त्यांच्या कार्यकालात घेतल्या गेलेल्या निर्णयांवर नजर टाकली तर सहजपणे याची खात्री पटते. यापूर्वी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहर दरवर्षी सपाटून मार खायचे. राजेश पाटलांनी ‘स्वच्छाग्रह’ हा नारा देत आरोग्य विभागाला सतत धावत ठेवून कचराकुंडी विरहित शहर करण्याचा केलेला संकल्प व त्यादृष्टीने दिलेली गती सॅल्यूट ठोकावा, अशीच म्हणावी लागेल. देशात इंदूर शहरच का प्रथम क्रमांक मिळविते? यासाठी पेटून उठलेले राजेश पाटील आपल्या कृतीतून या शहरासाठी बदल घडवित चालले होते.त्याचे परिणामही दिसून येऊ लागले होते व फळही शंभर टक्के मिळणारच याची त्यांना खात्री होती. हिजडा (तृतीयपंथी) बघून वाट बदलणं व तोंड फिरणारा खरंतर आपला समाज. या व्यवस्थेस सणसणीत चपराक ओढावी अशी कामगिरी त्यांनी या उपेक्षित घटकास पालिका कामकाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेत दाखवून दिली. तृतीयपंथीयांना आत्मसन्मान देणारी देशातील पहिली महापालिका अशा कामगिरीची नोंद त्यांच्या नावावर आज झाली आहे. या घटकास नुसताच रोजगार नाही तर त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून या समूहास आत्मनिर्भर करण्याचा त्यांनी केलेला संकल्प यातून त्यांच्यात दडलेला संवेदनशील हृदयाचा माणूसही दिसून येतो. आकडू, कमी बोलणारा ,हाताला न लागणारा ,अतिशिष्ट.. अशा चर्चा त्यांच्याबद्दल कायम चालत. मात्र आपण नागरिकांसाठी आहोत,दोन-चार पुढाऱ्यांपुढे शेपूट घोळणं, आणि थ्री पेज हाय फाय कल्चरमध्ये रमणं हा आपला प्रांत नाही हे ते ओळखून होते. आयुक्तपदाची खुर्ची ही गरिमा असलेली, सन्मान असलेली खुर्ची असून तिची शान व आदब राहील असेच वर्तन त्यांच्याकडून घडलं गेलं.आयुक्त कार्यालय म्हणजे गावजेवणाची जागा किंवा नगरसेवकांना कधीही गप्पा मारायचा अडडा त्यांनी बनू दिला नाही. शाई फेक करून चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्या एका नगरसेविकेस जेलवारी, वारंवार बदनामीच्या बातम्या आपल्या पोर्टलवर टाकणा-या पत्रकारास थेट कायदेशीर नोटीस, तर एका आमदारांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच फ्लेक्स काढण्याचा त्यांनी दिलेला इशारा यातून, ‘चुकीचं खपवून घेणार नाही… ‘ असं सांगणारं त्यांचं पाषाणहृदय देखील दिसून आलं. अतिसामान्य जीवन जगलेल्या राजेश पाटलांनी आयएएस झाल्यानंतर मात्र या पदाच्या प्रतिमेला कॅज्यूअल पातळीवर कदापि आणलं नाही .प्रशासनाचा कार्यकाल सुरू झाल्यानंतर जनसंवाद सभा सुरू करून जनतेला शहर विकासात सहभागी करून घेणे तसेच शहर सुशोभीकरण, अतिक्रमण कारवाई( विशेषतः वाकड,रावेत व मोशी भागातील),हाॅकर झोन निर्माण करून त्यांनी प्रचंड स्पीड दिला. सदैव बदनाम व भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आकाशचिन्ह परवाना विभागाने बाळसं धरावं यासाठी नवे होर्डिंग पॉलिसी धोरण त्यांनी आखलं. कर संकलन व बांधकाम परवानगी याद्वारे दरवर्षी तिजोरी भरते म्हणून त्यामध्ये सुसूत्रीकरण आणलं. वर्षानुवर्षे एकाच जागी गोचिडयासारखं बसलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या करून निर्माण झालेली मोनोपाॅली उधळून लावली. तर प्रशासनातील कित्येक वर्षे रेंगाळत पडलेल्या वर्ग २ ,वर्ग ३ मधील प्रमोशनचा किचकट गुंता त्यांनी अतिशय सुरळीतपणे सोडविला. सफाई कर्मचार्यांना घरे देणे असो, क्रीडा धोरण आखणे असो,शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्रे नुसत्या अभ्यासिका झाल्या होत्या त्यांनी ती पेटून उठणारी केंद्रं बनवून टाकली.
एक ना अनेक अशी शेकडो उदाहरणे सांगता येतील इतके बदल त्यांनी या शहराच्या विकासासाठी व प्रतिमा निर्मितीसाठी केले.यापूर्वीच्या अनेक आयुक्तांनी या शहराला आकार जरूर दिला, परंतु राजेश पाटील यांनी या शहराला ओळख देण्याचा चंग बांधला होता.
पुण्याच्या पोटात लपलेलं हे शहर नाही तर एक स्वतंत्र झेप घेतलेलं व कात टाकलेलं हे शहर आहे, हेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांची बदली झाली आहे. या शहरात ठशीव व भरीव केलेली कामगिरी म्हणून आज जसे प्रवीणसिंह परदेशी, डॉ श्रीकर परदेशी यांची नावे घेतली जातात, त्याच रांगेत ते पोहोचत असतानाच त्यांच्यावर बदलीची संक्रात आणून राज्य शासनाने काय साधले, हे कळायला मार्ग नाही. त्यांची बदली रद्द होईल अशीही चर्चा काल होती. एक बसलेली घडी व आखलेली चौकट त्यांच्या जाण्याने विस्कळीत होणार हे मात्र नक्की. आपला स्वभाव मितभाषी असला तरी ते कमी बोलण्यातून नेमका मार्मिक सूचक संदेश प्रत्येकाला देत. उदाहरणच द्यायचे झाले तर, पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकारांचे गोडवे न गाता त्यांनी, “हे काम करता करता एखादा जोडधंदा देखील करा.” असे भाषण करून वास्तवतेचे भान जागविण्याचे काम त्यांनी केले.
त्यांची कार्यशैली , शिस्तपणा, प्रशासनास दिलेली गतिमानता व शहराचे रूप व सौंदर्य बदलून बदलून टाकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती एवढी लोकप्रिय झाली होती की, शहरातील एका मोठ्या बिल्डरला त्यांच्या कौतुकाचे होर्डिंग्ज लावायला सुचावे , यातच सर्वकाही आले. चार महिन्यांपूर्वी झालेल्या त्यांच्या वाढदिवसाला सामान्य नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी ‘दिलसे’ केलेली गर्दी आश्चर्यचकित करणारी बाब ठरली. प्रचंड गाजलेल्या “पुष्पा” या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे,’ मैं झुकेगा नही साला… आपल्या कृतीतून हा डायलॉग त्यांनी अप्रत्यक्षरित्या व्यवस्थेला मारून आपले स्थान अधोरेखित करण्याची केलेली कामगिरी म्हणजे कमी बाॅलमध्ये धावांचा डोंगर रचून ठेवणारी ठरली आहे.
