बहुचर्चित अशा मुंबईत उभारण्यात येणाऱ्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम मागील तीन वर्षापासून प्रलंबित असल्याने, त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी १० लाख पोस्टकार्ड पाठविणे व हे स्मारक किनाऱ्यावर उभे राहण्याची मागणी प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांनी आज येथे केली.
संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे-१८ येथील असलेल्या संघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष अँड. लक्ष्मण रानवडे होते.
मराठा सेवा संघाच्या राज्यभर विस्तार असलेल्या जिल्हा, तालुका व शहर पातळीवर कार्यालयातील कामकाज व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी प्रदेश कार्यालयाकडून आढावा दिनांक १३, १४ या गेल्या दोन दिवसात घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मराठा सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेचा कामकाजाची व ३३ कक्षाच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी प्रा. तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील बैठक घेण्यात आली. त्यामध्ये राजू डुबल (जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ), शिवश्री. किरण घाडगे (अध्यक्ष, संभाजी बिग्रेड, पुणे विभाग), मनोज गायकवाड (पदवीधर व विद्यार्थी विभाग) यांचा समावेश होता. या वेळी राज्यभरात १ कोटी सभासद करणे तसेच कार्यविस्तार करणे आणि शिवस्मारकासाठी १० लाख पोस्टकार्डे पंत प्रधानांना पाठविण्याचा तसेच हे स्मारक समुद्रातील मध्यभागी न उभारता किनाऱ्यावर अथवा मोकळ्या जागेत उभे राहणे संयुक्तीक ठरेल असे मत मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांनी व्यक्त केले.
दोन दिवसांच्या पिंपरी चिंचवड आढावा बैठकीच्या पहिल्या दिवशी दिनांक १३ ला बैठका व दिनांक १४ ला सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या गाठीभेठी घेण्यात आल्या.
यावेळी मराठा सेवा संघाच्या शहरातील पदांच्या नियुक्त्या व जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार प्रकाश बाबर (शहर उपाध्यक्ष), गोरख वहील (संघटक), गोविंद खामकर (शहराध्यक्ष श्री जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद) अँड श्रीराम डफळ (शहराध्यक्ष मराठा सेवा संघ प्रणित विधी व न्याय कक्ष), डॉ. मोहन नलावडे (कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ आरोग्य कक्ष) डॉ. सुरजसिंह चौहान (सचिव आरोग्य कक्ष) आदिंना मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष लक्ष्मण रानवडे यांनी नियुक्ती पत्रे प्रा. अर्जुन तनपुरे यांच्या हस्ते दिली.
या वेळी डॉ मोहन पवार आरोग्य कक्ष, जिजाऊ बिग्रेड जिल्हाध्यक्ष सुनीता शिंदे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई, वधुवर सूचकचे अध्यक्ष मोहन जगताप, संभाजी बिग्रेड शहराध्यक्ष प्रवीण कदम, शहर मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष वाल्मिक माने, आदींनी आपला कार्यअहवाल सादर केला या वेळी राष्ट्रीय उद्योग कक्ष अध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, जिजाऊ बिग्रेड शहराध्यक्षा स्मिता म्हसकर, माणिक शिंदे, सदाशिव राजिवडे, सचिन दाभाडे, अशोक सातपुते, उपस्थित होते. शिवमती रत्नप्रभा सातपुते यांनी जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना सादर केली . कार्यकर्माचे आभार सुरेश इंगळे यांनी मानले.