(विजय जगताप)
तब्बल २० वर्षाहून अधिक काळ पिंपरी चिंचवडचे कारभारी म्हणून जबाबदारी पाहिलेले व शहराचा ब्रॅन्ड झालेले अजितदादा पवार यांची जागा आता खासदार डाॅ अमोल कोल्हे यांच्याकडे आल्याचे औपचारिकरित्या आज सिध्द झाले.
शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व सेल कमिटीच्या प्रमुखांची आढावा बैठक आज दुपारी आकुर्डीत पार पडली.अवघ्या १५ महिन्यांवर आलेली महापालिका निवडणूक पाहता राष्ट्रवादीच्या वतीने सत्ताधारी भाजपची पोलखोल, अंदाधुंद कारभाराची लक्तरे काढण्याची आगामी कार्यक्रम पत्रिकाच खासदार डाॅ कोल्हे यांनी यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करून अखेर रणशिंग फुंकले .
कोरोना काळात भाजपने टाळूवरचे लोणी खाण्याचा केलेला प्रकार , निविदांमधील भ्रष्टाचार,स्मार्ट सिटीच्या कामात केलेले घोटाळे याच्या सुरस व चमत्कारिक कथा आपण बाहेर काढणार असून महापालिकेच्या आगामी प्रत्येक सर्वसाधारण सभेला अमोल कोल्हे नागरिक म्हणून उपस्थित असलेले तुम्हाला पहायला मिळेल असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, वक्तृत्व, नेतृत्व व अभ्यासू प्रतिमा अवघ्या १५ महिन्यांच्या खासदारकीत प्राप्त केलेले डाॅ कोल्हे यांच्याकडे जाणिवपूर्वक कारभारी म्हणून माळ गळयात टाकण्यात आल्याने आगामी काळात भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगलेला पाहण्याची संधी शहरवासियांना मिळणार आहे.