परिवर्तनाच्या विचाराची मांडणी करत गेली वीस वर्षे प्रत्यक्ष आचरण करत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मुदळे यांच्या सुपुत्राचा विवाह आज रविवारी( ता.२८) अनोख्या पध्दतीने पार पडला.
कोरोनाचे संकट व लाॅकडाऊनची स्थिती या पार्श्वभूमीवर मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत वाल्हेकरवाडीतील ( चिंचवड)त्यांच्या निवासस्थानी हा परिवर्तनवादी आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.रूढी, परंपरा व जातरचनेची चौकट मोडत सामाजिक बांधिलकी जपणारा परिवार म्हणून मुदळे कुटूंबियांकडे पाहिले जाते.
त्यांचा मुलगा महेश व नाशिकच्या अरूण साळुंखे कुटूंबातील कन्या श्रध्दा यांचा हा विवाहसोहळा दुपारी एक वाजता वाल्हेकरवाडीतील संतकृपा या निवासस्थानी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला.
पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार सार्वजनिक आरोग्यहिताचा विचार करून मुदळे व साळुंखे परिवाराने समता व बंधूतेचे रूप आपल्या लग्नसमांरभांतून दाखवून दिले.
संविधानाचे वाचन करून व संविधानाला साक्ष मानत लाॅकडाऊन काळात पार पडलेला हा पहिला परिवर्तनवादी विवाह सोहळा ठरला.
मोजकीच मंडळी असली तरी भोजन ठेवल्यास सोशल डिस्टींक्शन कितीही प्रयत्न केला तरी राहत नाही ही बाब लक्षात घेऊन भोजनालाच येथे कात्री लावण्यात आली.